रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना

0

 

रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना, नागरिक त्रस्त

(Gondia)गोंदिया – गोंदिया शहराला दोन्ही भागांना जोडणारा रेल्वेचा जुना उड्डाण पूल जिर्ण झाल्याने वर्षभरापूर्वी तोडण्यात आला. नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी लागणारा निधीही मंजुर झाला. मंजुरीनंतर लवकरच उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू होऊन शहरातील वाहतुकीची कोंडी सुटेल अशी आशा होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात अद्यापही वाहतुकींची कोंडी कायम आहे. मात्र, या रेल्वे पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडला नसल्याने याबाब तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा रेल्वे पूल ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आला होता. तो जीर्ण व मुदत बाह्य झाल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी 2 मे 2022 रोजी या पुलावरून वाहतूक बंद केली. त्यानंतर तो उड्डाणपूल जमिनदोस्त करण्यात आला. पूल पाडल्यानंतर तातडीने नवीन पूल बांधला जाईल, अशी अपेक्षा जनता बाळगून होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया करण्यात आली. पुलासाठी शासनाने 47 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगण्यात आले. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच सप्टेंबर महिन्यापासून नवीन उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली. काही राजकीय पुढाऱ्यांनी डिसेंबरमध्ये बांधकाम सुरू होणार असल्याचे सांगितले. आता डिसेंबरही लोटत आहे. मात्र, नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली नाही.

पहिल्या टप्प्यात 15 कोटींहून अधिक निधीतून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलासाठी शासनाच्या संबंधित मंत्रालय स्तरावरून कार्यादेश मंजूर करण्यात आला आहे.शासनस्तरावरील प्रक्रिया पूर्ण होताच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. मात्र, अद्यापही या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडला नाही. परिणामी शहरातील वाहतुकीची कोंडी कायम आहे. हा पूल बंद असल्याने अंडरग्राउंड मार्गाने होणारी वाहतूक अनेक वेळा प्रभावित होत असते. परिणामी अपघाताच्या संख्येतही वाढ झाली. एकंदरीत लोकप्रतिनिधींचे आश्वासन तसेच प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष या फेऱ्यात या पुलाचे बांधकाम अडकल्याने शहरवासी संताप व्यक्त करू लागले आहेत. भूमिपूजन होऊन काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याच्या इशारा आता काँग्रेसतर्फे
अशोक गुप्ता, जिल्हा उपाध्यक्ष, कॉंग्रेस यांनी दिला. आमदार विनोद अग्रवाल यांनीही नाराजी व्यक्त केली.