

नागपूर ता २४ : स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘आत्मनिर्भर वार्ड’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक झोनमधून एक याप्रमाणे वार्ड निश्चित करण्यात आले आहे. या वार्डमधून ओला आणि सुका असा वर्गीकृत केलेलाच कचरा संकलीत करा, अशी सूचना मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी कार्यशाळेत दिली. (The concept of ‘Atmanirbhar Ward’ by Municipal Corporation: What is Atmanirbhar Ward?)
‘आत्मनिर्भर वार्ड’ संकल्पनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कचरा संकलन करणाऱ्या एजी एनव्हायरो आणि बीव्हीजी एजन्सीच्या कचरा गाडी चालक आणि कर्मचाऱ्यांचे शनिवारी (ता.२४) रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहामध्ये प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री नरेंद्र बावनकर, प्रमोद वानखेडे, विजय थूल, विभागीय अधिकारी मुख्यालय श्री. लोकेश बासनवार, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी कचरा गाडी चालक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. दररोज निर्धारित ‘रूट मॅप’ नुसार सकाळी ७ वाजता कचरा संकलनाला सुरुवात करावी व शेवटच्या घरातील कचरा संकलीत केल्याशिवाय फेरी पूर्ण करू नये, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कचरा संकलीत करताना नागरिकांकडून आता ओला, सुका असा विलगीकृत कचराच संकलीत करण्यात येईल, याबाबत जनजागृती करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
प्रशिक्षण कार्यक्रमात बीव्हीजी आणि आयइसी चमूद्वारे कचरावर्गीकरणाबाबत पथनाट्य सादर करण्यात आले. ए जी कंपनी चे समीर टोणपे आणि बीव्हीजी चे गणवीर उपस्थित होते.
आत्मनिर्भर वार्ड म्हणजे काय? What is Atmanirbhar Ward?
आत्मनिर्भर वार्ड म्हणजे असे वार्ड जेथे उत्पादित कचरा 100 टक्के वर्गीकृत् करुनच कचरा संकलीत करणाऱ्या वाहनात देण्यात येणार आहे. जेथे वार्ड सिमेच्या आत 100 टक्के ओला कचऱ्यावर प्रकिया करण्यात येईल व 100 टक्के सुखा कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येईल, असे वार्ड ‘आत्मनिर्भर वार्ड’ ठरेल.
‘आत्मनिर्भर वार्ड’ करिता निवडलेले प्रभाग
1) लक्ष्मीनगर झोन – प्रभाग 16,
2) धरमपेठ झोन – प्रभाग 15,
3) हनुमान नगर झोन – प्रभाग 31,
4) धंतोली झोन – प्रभाग 35,
5) नेहरुनगर झोन – प्रभाग 28,
6) गांधीबाग झोन – प्रभाग 18,
7) सतरंजीपुरा झोन – प्रभाग 5,
8) लकडगंज झोन –प्रभाग 23,
9) आशीनगर झोन – प्रभाग 7,
10) मंगळवारी झोन – प्रभाग 1.