ST bus : सरपंचासह नागरिकांनी रोखली चक्क एसटी बस,नेमकं काय घडलं?

0

अमरावती (Amravti), 13 सप्टेंबर  एसटी बस धामंत्रीमार्गे वळवण्यासाठी नागरिकांनी चक्क एसटी बस रोखून धरली. तिवसा येथून एक बसफेरी तिवसा-चिंधाई फाटा-भारसवाडी-आखतवाडा (मार्गे कुऱ्हा) अशी धावते. ही बस गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या फेरीने धामंत्री येथील विद्यार्थी व प्रवाशांना चिंधाई फाट्यावरून एक-दीड किलोमीटर पायी जावे लागते.

पाऊस आणि उन्हात पायी ये-जा करावी लागत असल्याने ही नियोजित फेरी धामंत्री मार्गे वळवण्यात यावी अशी संबंधितांची मागणी आहे. त्यासाठी चिंधाई फाट्यावर सरपंचासह नागरिकांनी हे आंदोलन केले. दुपारी सुटणारी ही एसटी बस धामंत्री, उबरखेड अशी केल्यास विद्यार्थी व प्रवाशांना सोयीचे होते. ऊन, पावसाचा त्रास सहन करावा लागणार नाही. ती बस भारसवाडी, आखतवाडा न पाठवता ती धामंत्री मार्गे झाल्यास फायदेशीर राहू शकते.

याबाबत सरपंच व गावकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते. मात्र एसटी महामंडळाने नियोजित फेऱ्या व टायमिंगचा ताळमेळ जुळत नसल्याने तसेच भारसवाडी, आखतवाडा ही दोन गावे पुन्हा सुटल्या जातील. यामुळे महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र धामंत्री येथील नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न उचलून धरला होता. त्यानुसार आंदोलनाचा इशाराही दिला होता.

त्यानुसार तिवसा येथून निघालेली एमएच ५७०३ ही बस चिंधाई फाटा येथे येताच नागरिकांनी रस्ता रोको करून बस अडवली. त्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख विलास माहोरे सरपंच राजेंद्र मढवे यांनी तिवसा येथील वाहतूक नियंत्रक प्रतीक मोहोड यांच्याशी समन्वय साधून तोडगा काढण्यात आला.