
खासदार प्रतिभा धानोरकरांचा फडणवीस सरकारला संतप्त सवाल
चंद्रपूर :- अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या १३३९ कोटी रुपयांहून अधिक मदत निधीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वजिल्ह्याकडे (चंद्रपूर) दुर्लक्ष का करत आहे? असा थेट प्रश्न उपस्थित करत, शासनाच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.
महसूल आणि वन विभागाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून निधी मंजूर करण्यासंदर्भात शासन निर्णय (GR) काढला. मात्र, जून ते ऑगस्ट २०२५ या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही, या शासन निर्णयाच्या यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही, ही गंभीर बाब खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून समोर आणली आहे.
पिकांचे मोठे नुकसान, तरीही दुजाभाव कायम:
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारखी प्रमुख पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषतः, सोयाबीन पिकावर खोडकुज, मूळकुज आणि यलो व्हेन मोझॅक या बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे, ज्यामुळे उभे पीक पिवळे पडून नष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, त्यांनी सरकारकडे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, २३ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयाच्या यादीत तात्काळ चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्वजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता सरकार कधी आणि कोणती कार्यवाही करते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.