Home MAHARASHTRA Wife Murder : का केली पत्नीची निर्घृण हत्या?

Wife Murder : का केली पत्नीची निर्घृण हत्या?

0

गडचिरोली (gadchiroli), 18 जुलै अहेरी तालुक्यातील (Aheri taluka)मांड्रा येथील आरोपी पती सदाशिव लखमा नैताम (वय ४५) याने चारित्र्याच्या संशयातून पत्नी रत्ना सदशिव नैताम (३५) हिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलिसांनी सदाशिव नैताम याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

सदाशिव लखमा नैताम हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे दोघा पती-पत्नीत वारंवार वादाचे खटके उडत असत, अशातच (ता. १७ जुलै) बुधवारी सकाळच्या सुमारास दोघांत जोरदार वाद झाला. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला, आणि आरोपी पतीने पत्नीच्या तोंडावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप दोन वार करून तिला यमसदनी धाडले.कुऱ्हाडीच्या वाराने रत्ना नैताम ह्या जमिनीवर कोसळल्या, त्या निपचित पडून असलेल्या ठिकाणच्या बाजूलाच आरोपी पती सदाशिवही आराम करत बराच वेळ तिथे पडून राहिला होता. (wife murder case)

रत्ना व सदाशिव नैताम यांना १८ वर्ष वयाचा चिरंजीव नामक मुलगा आहे, तो सकाळी आठ वाजतापासून आपल्या शेतात कामाला गेला होता, त्यामुळे घरी दोघेच नवरा-बायको होते, अशातच घरी कोणी नसल्याची संधी साधून सदाशिव नैताम याने पत्नीची हत्या केली.

दरम्यान सदरच्या हत्येची घटना सदाशिवचा पुतण्या राहुल हनुमंतु नैताम याच्या निदर्शनात आली, त्याने ही बाब शेतात काम करणारा चुलत चिरंजीव याला शेतात जाऊन कळविले , मिळालेल्या माहितीवरून चिरंजीव धावपळ करत शेतातून घरी परत आला व त्याने रक्तबंबाळ अवस्थेतील आईला पाहून हंबरडा फोडला, व लागलीच बाजूला आरामात पडून असलेल्या आरोपी वडिलांना चिरंजीवने त्याचे आजी, आजोबा, नातेवाहिक व गावकऱ्यांच्या मदतीने एका ठिकाणी बांधून ठेऊन घटनेची माहिती दामरंचा पोलिसांना दिली. रक्तबंबाळ अवस्थेतील रत्ना नैताम यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

मुलगा चिरंजीव सदाशिव नैताम याच्या तक्रारीवरून सदाशिव याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दासुरकर यांच्या मार्गदर्शनात दामरंचा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे व कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.