

नकार द्या, पहिल्यांदा आणि प्रत्येकदा ; जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिनावर शहर पोलिसांचे तरुणाईला आवाहन
नागपूर(Nagpur) २६ जून :- ” नशेला नाही म्हणा, पहिल्यांदा आणि प्रत्येकदाच.”, नागपूर शहराच्या सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस भवन येथे आयोजित कार्यक्रमात म्हणाल्या. शहर पोलीस आयुक्तालय तसेच सेवाभावी संस्था ‘प्रकृती ट्रस्ट’ व मैत्रयी व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दारू व ड्रग्स च्या व्यसनाचा सरळ संबंध रस्ते अपघात, गुन्हेगारी, तसेच मुलींच्या बाबतीत बोलायचे झाल्यास देहव्यवसायाशी सुद्धा आहे, दोरजे म्हणाल्या. मित्रमंडळींमध्ये येणारे ‘पियर प्रेशर’ किंवा ‘फोमो’ म्हणजे ‘फियर ऑफ मिसिंग आऊट’ मुळे तरुण मुलं मुली नशा ‘करून बघतात’ आणि पाहता पाहता नशेच्या आहारी जातात. आत्म-संयम ही गुरुकिल्ली दोरजे यांनी तरुणाईला दिली. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील व अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) डॉ शिवाजी राठोड यांनी सुद्धा आपले विचार मांडले. या प्रसंगी अपर पोलीस आयुक्त (उत्तर) प्रमोदकुमार शेवाळे व गुन्हे शाखेचे विभागीय पोलीस आयुक्त निमिष गोयल मंचावर उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेने या वर्षी ” प्रतिबंधात गुंतवणुक करा” ही जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिनाची विषयवस्तू म्हणून निश्चित केलेली आहे. या विषयाला धरून एका घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंग इंडिया अनचेन्ड च्या विद्यार्थी परिषदेसोबत मिळून शहर पोलिसांनी स्पर्धा आयोजित केली. यंग इंडिया अनचेन्ड या उपक्रमांतर्गत नागपूर शहराचे दहा हजार विद्यार्थी गुन्हे प्रतिबंधाचे उद्दिष्ट समोर ठेऊन पोलिसांसोबत सामुदायिक पोलिसिंग पार्टनर म्हणून काम करतात. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक घोषवाक्यांपैकी सर्वोत्तम पाच घोषवाक्ये निवडली.
दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चे शिवम एखांडे, रेणुका बांगर, ऋषिकेश शिंदे ; यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ख़ुशी कटरे व सीताबाई नारगुंडेकर नर्सिंग कॉलेज च्या इशा बैस हे पाच विद्यार्थी विजेते ठरले, मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली. या पाच विद्यार्थ्यांनी लिहिलेली घोषवाक्ये शहर पोलिसांच्या पोलीस दीदी व पोलीस काका अभियानात वापरण्यात येतील असे अस्वती दोरजे यांनी जाहीर केले.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उपस्थितांना नशा मुक्त जीवनाची शपथ दिली. मैत्रयी संस्थेचे तुषार नातु, रवी पाध्ये व त्यांच्या चमूने नशेच्या दुष्परिणामांवर एकांकिका सादर केली. अल्कोहोलिक्स अनॉनिमस चे उमेश जाधव आणि दारू व ड्रग्स च्या विळख्यातून बाहेर पडलेल्या इतर काही लोकांनी आपले मनोगत मांडले. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.