

व्हायोलिन व शास्त्रीय गायनाचा रसिकांनी घेतला आनंद
‘गुणीजान’ समारोहाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद
नागपूर :सुरेल शास्त्रीय गायन आणि उत्तुंग व्हायोलिन वादन यामुळे गुणीजान समारोहाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबई व सप्तक, नागपूर प्रस्तुत ‘गुणीजान’ समारोहाचे आयोजन आज सायंटिफीक हॉल, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्हायोलिन वादक अनुप्रिया देवताले यांच्या वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबल्यावर तरुण लाला यांनी साथ दिली. कार्यक्रमाची सुरवात त्यांनी राग गोरख कल्याण मधील आलाप आणि जोडने केली. दर्दी रसिकांनी त्यांच्या सादरीकरणाला साजेशी साथ टाळ्यांचा कडकडाट करून दिली.
तत्पूर्वी नागपूरचे प्रसिद्ध व्हायोलिन वादक शिरीष भालेराव यांनी त्यांचा स्वागत सत्कार केला.
त्यानंतर पं. सुरेश बापट यांचे शास्त्रीय गायन झाले. धनकोनी कल्याण रागातील पंडित सी. आर. व्यास रचित बंदिशीने कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरेल सुरवात त्यांनी केली. ‘मन रिझाई गुणीजन की सेवा’ हे शब्द कानावर पडताच श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. तबल्यावर संदेश पोपटकर व संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी साथसंगत केली. तानपुऱ्यावर सृष्टी कुलकर्णी आणि आयुष देशपांडे होते.
या कार्यक्रमाचे उत्तम निवेदन आणि आभार प्रदर्शन वृषाली देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत देशपांडे, अरविंद चोपडे आणि नितीन सहस्त्रबुध्ये यांचे सहकार्य लाभले. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.