Vitthal Abhang : विठ्ठल नादाने वातावरण झाले भक्तिमय

0

पारंपरिक-नव्‍या अभगांना रस‍िकांची भरभरून दाद

नागपूर (Nagpur)
कर कटेवरी ठेवूनी विटेवरी उभा असलेल्‍या विठ्ठलाच्‍या भक्‍तीत तल्‍लीन झालेल्‍या गायकांच्‍या ‘विठ्ठल… विठ्ठल’ च्‍या नादाने सायंटिफिक सभागृहातील वातावरण आज भक्तिमय झाले. गायकांनी सादर केलेल्‍या पारंपरिक व नव्‍या अभगांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

सप्तक, नागपूरच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्‍य साधून ‘नाऽद विठ्ठल विठ्ठल!’ हा कार्यक्रम मंगळवारी सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्‍यात आला होता. नागपूरचे गुरू प्रसाद गुळवणी यांचे शिष्‍य असलेले रत्‍नाग‍िरीचे युवा गायक अजिंक्‍य पोंक्षे यांनी दिंडीचे वर्णन करणारा ‘दिंडी चालली चालली’ हा अभंग सादर करून रसिकांना वारीचा अनुभव दिला. त्‍यानंतर केतकी चैतन्‍य यांनी संत ज्ञानेश्‍वरांची रचना ‘रूप पाहता लोचनी’ सादर करून विठुरायाचे गोजिरे रुप रसिकांच्‍या डोळ्यासमोर उभे केले. अजिंक्‍यने संत तुकाराम महाराजांची रचना ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ सादर केली. त्‍याने गडगडला मृदुंग, हरी भजनाविण काळ, कानडा राजा, अवघे गरजे पंढरपूर हे अभंग तर केतकीने विठ्ठल माझी माय, पांडुरंग नामी, पद्मनाभा नारायणा, जोहार मायबाप अशा रचना सादर केल्‍या. कार्यक्रमाचा समारोप केतकीने ‘अगा वैकुंठाच्या राया’ या अभंगाने केला.

बासरीवर अरविंद उपाध्‍ये, किबोर्डवर परिमल जोशी, संवादिनीवर शैलेश दाणी, तबल्‍यावर डॉ. देवेंद्र यादव, पखवाजवर ऋषिकेश फडके तर तालवाद्यावर विक्रम जोशी यांनी उत्‍तम साथ दिली. कलाकारांचा म‍िलिंद खासनीस यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. चित्रकार प्रमोद कळमकर यांनी समर्पक नेपथ्‍य करीत भक्‍तीमय वातावरणात भर घातली. कार्यक्रमाच्‍या सुरुवातीला ज्‍येष्‍ठ रंगकर्मी व अजित बेकरीचे संचालक अजित दिवाडकर यांच्‍या निधनाबद्दल शोक व्‍यक्‍त करण्‍यात आला व त्‍यांना श्रद्धांजली वाहण्‍यात आली.

या कार्यक्रमाचे अतिशय अभ्‍यासपूर्ण निरुपण प्रसिद्ध निवेदिका वृषाली देशपांडे (Vrishali Deshpande) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उदय गुप्‍ते यांनी केले. या कार्यक्रमाला दिवाडकर्स अजित बेकरी, खासनीस प्राईम वेल्‍थ मिलिंद खासनीस यांचे सहकार्य लाभले.

नव्‍या रचनांची अनुभवली गोडी

या भक्तिमय स्‍वरधारेच्‍या कार्यक्रमात नागपूरचे ख्‍यातनाम कवी महेंद्र पेंढरकर (Mahendra Pendharkar)यांच्‍या नव्‍या रचनाही गायकांनी यावेळी सादर केल्‍या. संगीतकार शैलेश दाणी यांनी या नव्‍या रचनांना स्‍वरसाज चढवला होता. ‘वेळ झाली पांडुरंग’, आत्‍मानंदे, रंग रंग या रचनांना अंजिक्‍य व केतकीने सादर करीत रसिकांना आनंद दिला.