
हवामानशास्त्र विभागानं गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या वाटचालीबाबतची प्रत्येक लहानमोठी माहिती दिल्याचं पाहायला मिळालं आहे. आता तर, खुद्द हवामान विभागाकडूनच मान्सूनच्या आगमन तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला लक्षद्वीप बेट समुह आणि श्रीलंकेतून तो अतिशय वेगानं पुढे सरकत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या धर्तीवर यंदाच्या वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार असून, त्यानंतर त्याचा महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास सुरु होईल आणि राज्यात हा पाहुणा 10 जूनला धडकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मान्सूनच्या आगमनापूर्वी उन्हाच्या झळा
तिथं मान्सूनची वाटचाल सुरु झाली असली तरीही त्याच्या येण्याची वाट पाहण्याचं सत्र अद्यापही सुरु आहे. किंबहुना ही प्रतीक्षा आता अवघ्या काही दिवसांची असली तरीही त्याच उन्हाचा मारा मात्र सर्वांनाच सहन करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी वारे, पाऊस राज्यात दाखल होईपर्यंत विदर्भासह आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.