

गडचिरोली GADCHIROLI – गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित खाण प्रकल्पांना विरोध करणारं पत्र माओवाद्यांनी प्रकाशित केलं आहे. तोडगट्टात आंदोलन करणाऱ्या आदिवासी नेत्यांना नुकतीच पोलिसांनी अटक केली. या कारवाईच्या विरोधात माओवाद्यांनी 30 नोव्हेंबरला गुरुवारी बंद पुकारला असून माओवाद्यांच्या या पत्रकबाजीमुळं गडचिरोली पोलिस अलर्ट मोडवर आहेत.
सोमवारी तोडगट्टाजवळ आदिवासी नेत्यांनी ग्रामस्थांसह पोलिसांना घेरले. सध्या संपूर्ण एटापल्ली तालुक्यात कलम 144 लागू करण्यात आले असताना माओवाद्यांनी हे पत्र काढत गडचिरोली बंद पुकारला. या काळात हिंसक घटनांची शक्यता लक्षात घेता पोलिसही सज्ज आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) गडचिरोली पश्चिम सब झोनल ब्यूरो प्रवक्ता श्रीनिवासने हे पत्र काढले असून या पत्रात गडचिरोलीतील उत्तरेकडील झंडापार पासून दक्षिणेकडील बाबुलाई पहाडापर्यंतच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करीत सरकार केवळ खाणींना परवानगी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात एकेरी भाषेचा वापर करीत श्रीनिवासने गडचिरोली, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाचा उल्लेख केला आहे.
तोडगट्टा येथे सुमारे 255 दिवसांपेक्षाही जास्त कालावधीपासून खाण विरोधात आंदोलन सुरू आहे. आदिवासींच्या या आंदोलनाला माओवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आदिवासी नेत्यांना मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि अन्य लोकप्रतिनिधींनी यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करावा, असंही श्रीनिवासनं म्हटलय. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात कलम 144 लावत पोलिस आदिवासींना त्रास देत आहे. त्यामुळं गुरुवार, 30 नोव्हेंबरला माओवादी गडचिरोली बंद पाळणार आहेत. आदिवासी ग्रामसभांनी आंदोलन आणखी तीव्र करावं अशी चिथावणीही पश्चिम सब झोनल ब्यूरोने दिली आहे हे विशेष.