


रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे भव्य सादरीकरण
नागपूर, १५ ऑक्टोबर :
तारा राणी फाउंडेशन आणि राधिका क्रिएशन (नागपूर–पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने, लेखक श्रीधर गाडगे आणि दिग्दर्शक संजय पेंडसे यांच्या ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या हिंदी नाटकाचा सुवर्ण महोत्सवी (५०वा) प्रयोग १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले तीन सरसंघचालक यांच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि विचारधारा यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, तर प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची होती. प्रारंभी संजय पेंडसे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर ॲड. आशिष शेलार यांनी सुवर्ण महोत्सवी सादरीकरणाबद्दल आयोजक संस्थांचे अभिनंदन करून या नाटकाचे अधिक प्रयोग राज्यभर करण्याचे आश्वासन दिले. तसेच संघाच्या कार्यकुशलतेबद्दल गौरवोद्गार काढले.
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आपल्या भाषणात रामटेकमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनुभवांबद्दल सांगितले. त्यांनी बालपणापासूनच संघाच्या शाळेत शिक्षण घेतल्याचे आणि त्या काळात मिळालेल्या संस्कारांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर आजही आहे, असे सांगून संस्थेच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल प्रशंसा केली.
या नाटकात मनीष उके (डॉ. हेडगेवार), ॲड. रमण सेनाड (परमपूज्य गुरुजी गोलवलकर), स्वप्निल जतकर, अनिल पालकर (महात्मा गांधी), तसेच मीनल मुंडले (भारत माता) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.
‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या नाटकाच्या सुवर्ण महोत्सवी सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सादरीकरणाची प्रशंसा करण्यात आली.