

नागपूर (Nagpur)वेद बांब (Ved Bamb)या नागपूरमधील २३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाने एक नवा इतिहास घडवला आहे. ख्यातनाम पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पात्र ठरलेला तो पहिला भारतीय पोकेमॉन गो खेळाडू ठरला आहे. अमेरिकेत हवाईमधील होनोलुलू येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे.
जगातील सर्वात लोकप्रिय गेमिंग कार्यक्रमात सहभागी होत वेद बांब आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व (Representation of India at international level) करणार आहे. पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये एकूण २० लाख डॉलर्सची बक्षिसे आहेत.
एप्रिल २०२४ मध्ये वेदने भारतातून ऑनलाइन पात्रता फेरीत सहभाग नोंदवला होता. यातील ५०० हून अधिक स्पर्धकांमधून तो दोन पात्र फेऱ्यानंतर विजेता ठरला. त्यानंतर भारतातील १५ सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरोधात खेळताना प्रत्येक सामन्यात कोणतेही नुकसान न होता तो जिंकत गेला. नागपूर ते होनोलुलू असा पल्ला गाठणारा पहिला भारतीय म्हणून वेदने भारतीय ईस्पोर्ट उद्योगात महत्त्वाची कामगिरी केली आहे.
पोकेमॉन गो हा एक ऑगमेंटेड रिअलिटी मोबाइल गेम आहे. पोकेमॉन फ्रँचाईझीचा भाग असलेला हा गेम निऑन्टिकतर्फे निर्मित आणि सादर केला गेला आहे. निन्तेंदो आणि पोकेमॉन यांच्या सहभागातील ही कंपनी जगातील सर्वात मोठी ऑगमेंटेड रिअलिटी (एआर) कंपनी आहे.