

नर्मदा परिक्रम आंतरिक परिवर्तनाची अनुभूती देते – बाबा महाराज तराणेकर
नागपूर (Nagpur), 16 मार्च
नर्मदा परिक्रमा केल्याने आंतरिक परिवर्तनाची अनुभूती येते, आपल्यातला बदल अनुभवता येतो. पण त्यानंतर सर्वसामान्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच वावरता येणे, ही स्थितप्रज्ञ अवस्था प्रत्येकाने अंगिकारणे हे परिक्रमेचे खरे फलित असते, असा हितोपदेश इंदूरच्या नाना महाराज तराणेकर संस्थाचे प्रमुख व अखिल भारतीय त्रिपदी परिवारचे अध्यक्ष बाबा महाराज तराणेकर यांनी केला.
नाना महाराज व बाबा महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्रिपदी परिवार नागपूर यांच्या सहयोगाने डॉ. सुरुचि अग्निहोत्री नाईक लिखित ‘नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बाबा महाराज तराणेकर होते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक डॉ. अमृता इंदूरकर, लेखिका डॉ. सुरुची अग्निहोत्री-नार्ईक, सर्वोत्तम प्रकाशनाचे अश्विन खरे, त्रिपदी परिवारचे राजीव हिंगवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाबा महाराज यांनी डॉ. सुरूची नाईक यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले. राजीव हिंगवे यांनी, सुरूचिताईंनी लिहिलेले अनुभव हे सर्वांना उपयोगी ठरणारे असल्याचे सांगितले. डॉ. अमृता इंदूरकर पुस्तकावर भाष्य करताना म्हणाल्या, या ग्रंथाची व्याप्ती मोठी आहे. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक भाग्योदयाकरिता आणि सर्व विकारांवर ताबा मिळविण्याकरिता परिक्रमा करायची असते. लेखिका सुरुची यांनी त्यांना आलेले अनेक दिव्य अनुभव उपस्थितांसमोर प्रस्तुत केले. परिक्रमेचे बीज गुरूमाउलीच्या कृपेने पेरले आणि त्यांनीच ती पूर्णही करून घेतले. कोणत्याही गोष्टीचा संचय करू नये ही महाराजांची शिकवण लक्षात ठेवून माझे अनुभव लिहायला घेतले. या माझ्या अनुभवातून एखाद्यालाही परिक्रमेची इच्छा झाली तर माझे लिखाण सार्थकी ठरेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
आभार प्रदर्शन अश्विन खरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयुरा कथने यांनी केले. यावेळी त्रिपदी परिवारातील भाविक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.