रत्नागिरी (Ratnagiri) : रत्नागिरी येथील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी तत्कालीन माजी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. आता तेच या प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असे रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Industry Minister Uday Samant on Barsu Refinery Project) सांगितले. रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे गटाचे जे काही मनसुबे होते ते उधळले गेले आहेत. त्यामुळेच रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत आहे, असा आरोपही सामंत यांनी केलाय. या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला काही जणांचा विरोध असला तरी या प्रकल्पाला अनेकांचे समर्थनही आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्रहिताचा हा प्रकल्प आहे. त्यामुळेच हा प्रकल्प व्हावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. बारसूत रिफायनरी व्हावा, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहिलेले नाही तर उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र लिहिले आहे, असे सामंत म्हणाले. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. मात्र, ठाकरे गटाचे दुसरे नेते संजय राऊत प्रकल्पाला विरोध करत आहेत. ठाकरे गटाची ही दुटप्पी भूमिका आहे. ठाकरे गट केवळ आपल्या स्वार्थासाठी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. आता सगळ्याच विरोधकांनी पत्रकार परिषद घ्यावी व आमच्यामुळेच हा उद्योग राज्याबाहेर जात असल्याचे जाहीर करून टाकावे, असा टोलाही त्यांनी लगावला.













