दहापैकी ८ लोकसभेच्या जागांवर ठाकरे गटाचा दावा

0

मुंबई : MUBAI मुंबई महानगर प्रदेशातील लोकसभेच्या दहा पैकी आठ जागा लढवण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीत लढताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ठाकरे गटाचा हा दावा हे दोन्ही पक्ष मान्य करणार का, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातर्फे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून शिवसेनेने लढवलेल्या तीनपैकी तीन जागा निवडून आल्या होत्या. त्यातील राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर हे दोन खासदार एकनाथ शिंदे गटासोबत आहेत, तर अरविंद सावंत हे ठाकरे गटासोबत आहेत. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यावर वेगळे चित्र आहे. उर्वरित दोन जागांवर ठाकरेंना उमेदवार निश्चित करायचे आहेत. यापैकी गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात त्यांचेच सुपुत्र अमोल कीर्तिकर मैदानात उतरण्याची चर्चा आहे. तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.