

बद्रीनाथ(Badrinath), १५ जून :- उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरुन वेगाने जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते वाहन थेट अलकनंदा नदीत पडले. या भीषण अपघातात बसमधील १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमध्ये २३ प्रवासी असल्याची माहिती आहे. दिल्लीतील रहिवासी असलेले सर्वजण बद्रीनाथ येथे दर्शनासाठी जात होते. प्रवासी ज्या ठिकाणी पडले ते २५० फूट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रुद्रप्रयाग शहरापासून ५ किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोलीजवळ ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेला टेम्पो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक डॉ. विशाखा भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून मिनी बससह जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मात्र, या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून ५ जण जखमी आहेत. पोलीस आणि एसडीआरएफची टीमच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. विशाखा अशोक भदाणे यांनी सांगितले की, रुद्रप्रयागमधील रंटोलीजवळ महामार्गावरून एक टेम्पो ट्रॅव्हलर खड्ड्यात कोसळली आणि पुढे अलकनंदा नदीत जाऊन पडली. स्थानिक लोक, एसडीआरएफ, अग्निशमन सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जल पोलीस बचावकार्य करत आहेत.
जिथे हा अपघात झाला तिथे रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू होते. लोकांना वाचवण्यासाठी तीन मजुरांनी नदीत उड्या घेतल्या. यापैकी दोन परत आले. मात्र या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.