सांगा, सरकार शेतकऱ्याने जगावे कसे ?सोयाबीनच्या उतारीने स्वप्न भंगले

0

सांगा, सरकार शेतकऱ्याने जगावे कसे ?
सोयाबीनच्या उतारीने स्वप्न भंगले
खर्च 80 हजार उत्पन्न 7 हजार

मोझरी (शेकापूर) / वर्धा : यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक पूर्णत: हातचे गेले .त्यातच सोयाबीनच्या शेंगा पोचट झाल्या. सोयाबीन काढणीसाठी परवडत नसताना सुद्धा कोसुर्ला येथील शेतकऱ्याने सात बॅग सोयाबीनच्या पेरल्या आणि हाती आले 11 क्विंटल 28 किलो सोयाबीन. त्यामुळे व्यथित शेतकऱ्याने जगावे कसे,हा सवाल सरकार मायबापाला विचारला आहे.
या भागातील शेतकऱ्यांकडे आज उपलब्ध सोयाबीनला 750 रु. क्विंटल दर मिळाला.परिणामी,शेतकऱ्याने जगायचे कसे? हा यक्ष प्रश्न आहे. आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची ही थट्टाच म्हणावी लागेल!
हिंगणघाट तालुक्यातील कोसुरला (बाबापुर)चे शेतकरी उमेश पांडुरंग भोकटे यांचेकडे साडेसहा एकर शेत असून त्यापैकी पाच एकरात सोयाबीनची पेरणी केली. उर्वरित शेतामध्ये कपाशी असून ती ही बोंड विरहित असल्यामुळे कापसाचे उत्पन्न देखील समाधानकारक हाती लागण्याची शक्यता दिसत नाही. सोयाबीन दिवाळीपूर्वी निघत असल्यामुळे आणि कपाशीच्या पिकांपेक्षा अल्पावधीत होणारे असल्याने यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न होईल, या अपेक्षेने भोकटे यांनी सोयाबीनला पसंती दिली होती.ऐन हंगामात पीक डौलदार दिसत असल्यामुळे त्यांनी रुपयांची जुळवा जुळव करून सोयाबीनच्या मशागतीवर खर्च केला. परंतु, संततधार अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक सतत पाण्याखाली होते. काही झाडांना थोड्याफार शेंगा धरल्या होत्या,पण येलो मोजाक आणि चारकोल रोगाने सोयाबीनची वाट लावली.अखेर अत्यल्प का असेना पण सोयाबीन कापणी तर करावीच लागेल या आशेने शेतकऱ्याने खर्च करून ते काढले. उत्पन्न केवळ 11 क्विंटल 28 किलो सोयाबीन बघून शेतकरी वैफल्यग्रस्त झाला. सोयाबीनच्या बियाणे खरेदीसाठी 21 हजार, पेरणी खर्च 7 हजार, तणनाशक, कीटकनाशक, रासायनिक खत, मशागत, आणि सोयाबीन कापणीचा असा एकूण खर्च 80000 च्या घरात आहे,असे शेतकरी उमेश भोकटे सांगतात.
शेतकऱ्याने सदर सोयाबीन हिंगणघाटच्या बाजार समितीत10 ऑक्टोबरला विक्रीसाठी नेले. लिलावात व्यापाऱ्यांनी केवळ 750 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला! 11 क्विंटल 28किलो सोयाबीनला केवळ 7248 रुपये किंमत आली. सोयाबीनचा खर्च आणि झालेले उत्पन्न याचा ताळमेळ बसेना ! खरीप‌हंगाम सजवण्यासाठी उसनवारीने आणलेले कसे फेडायचे आणि संसाराचा गाडा कसा पुढे न्यायचा,? या विवंचनेत उमेश सह‌अनेक शेतकरी सापडले आहेत. दिवाळी सारखा सण घरात कसा साजरा करायचा आणि सगेसोयरे कसे सांभाळायचे! त्यातही एखाद्याकडे नवविवाहित जोडपे आले तर! या चिंतेने‌ अनेकांची झोप उडाल्याचे सहज दिसून येत आहे.