
बुलढाणा – अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील असोला शिवारात एका 19 ते 23 वर्षे वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. चिखली देऊळगावराजा रोडवरील असोला शिवारात सकाळी हा प्रकार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. चिखली ते अंचरवाडी दरम्यान असोला शिवारात असलेल्या हॉटेल राजवाडाच्यामागे हा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळालेला आहे, त्यामुळे ही तरुणी नेमकी कोण? हे अद्याप समजले नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि अंढेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तरुणीचा आधी गळा आवळण्यात आला, डोक्यात मागील बाजूला दगडाचा वार करण्यात आला, आणि तरुणीच्या अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून जाळण्यात आले, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. तरुणीचा मृतदेह विवस्त्र असल्याने तिला मारण्याआधी बलात्कार केला, असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तिवसा तहसील कार्यालयावर आंदोलन
अमरावती – अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान असताना देखील तालुका हा यादीतून वगळण्यात आला. हाती येणाऱ्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन तिवसा महसूल विभागाने तालुक्यात कुठेही नुकसान नाही, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. निवेदन, आंदोलन करून देखील महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांची दाखल घेतली नाही. त्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर तहसीलदार यांच्या निषेधार्थ पायऱ्यांवर नतमस्तक होऊन आंदोलन केले. यावेळी प्रहारचे पदाधिकारी व तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी का केले टायर जाळून आंदोलन ?
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात सध्या रब्बी पिकाचा हंगाम सुरू आहे आणि रब्बी पिकांकरिता मोठ्या प्रमाणात पाण्याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांना करावे लागते, याकरिता शेतकऱ्यांना विद्युत हवी आहे.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्याला 12 तास वीज पुरवठा देण्यात यावी, या मागणीसाठी सरकारचा निषेध करून टायर जाळून आंदोलन करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव क्षेत्र हा धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या हंगामासाठी 12 तास वीज हवी असल्याने मागील अधिवेशनामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून 12 तास वीज पुरवठा देण्यात यावी, या मागणीकरिता निवेदन दिले होते. आणि त्यानुसार 31 डिसेंबर पर्यंत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 12 तास वीजपुरवठा करण्यात आला होता. मात्र, 1 जानेवारीपासून कोणतीही पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आणि रात्री फक्त आठ तास वीज देण्याचे विद्युत विभागात द्वारा धोरण अवलंबले गेले. याचा निषेध करीत शरद पवार गटाने आज अर्जुनी मोरगाव येथे मुख्य चौकात आंदोलन केले.आंदोलनाची दखल घेऊन 12 तास वीज पुरवठा करण्यात आला नाही तर उपोषणाला बसण्याची तयारी मिथुन मेश्राम यांनी दर्शविली.