हिवताप प्रतिबंधासाठी अशी घ्या काळजी

0

हिवताप प्रतिरोध आणि उपाययोजना

जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना राबविला जातो. त्यानिमित्त हिवताप प्रतिरोधासाठी राबवावयाच्या उपाययोजनांची माहिती देणारा हा विशेष लेख.

दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते.त्यामुळे हिवताप, डेंग्यू , चिकनगुन्या या सारखे किटकजन्य आजारांचा प्रसार होतो. डासाची मादी ही साचलेल्या पाण्यात अंडी घालते. साधारण ८ ते १० दिवसात नवीन डास जन्माला येतो. चावण्याने बाधीत व्यक्तिंच्या शरीरातील जंतू हे डासांच्या माध्यमातून निरोगी व्यक्तिच्या शरिरात जातात. तेथे त्या रोगजंतूंची वाढ होऊन हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या असे आजार फैलावतात. हे आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती खालील प्रमाणे

हिवताप हा परजीवी किटकांमुळे होतो. अॅनाफिलिस मादी डास चावल्यामुळे होतो.

चिकनगुन्या व डेंग्यु हे एडिस इजिप्टाय या दुषित डासाच्या दंशामुळे होतात व हे आजार विषाणूजन्य (व्हायरल) आहेत.

• हिवतापाची लक्षणेः-थंडी वाजुन ताप येणे,डोके दुखी, एक दिवस आड ताप, उलटी होणे.

• डेंग्युची लक्षणेः- ताप,तीव्र डोकेदुखी,अंगदुखी,मळमळ,उलट्या, अंगावर पुरळ व तीव्र प्रकारात रक्तस्राव व बेशुद्धावस्था.

• चिकनगुन्या आजाराची लक्षणे –ताप,तीव्र सांधेदुखी,क्वचित अंगावर पुरळ,डोकेदुखी इ..

• प्रतिबंधात्मक उपाययोजनाः-

१. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे.

२. घरातील कुलर्समधील पाणी,फुलदाण्यातील पाणी,मनि प्लॅंटमधील पाणी इ. दर चार दिवसाला बदलावे.

३. हौद,गच्चीवरील टाक्या यांना नेहमी झाकण असावे. घरातील पाण्याची भांडीही झाकून ठेवावी, जेणेकरून त्यात डास अंडी घालणार नाही.

४. दर शनिवार कोरडा दिवस पाळावा.

५. परिसरातील सांडपाण्यामध्ये खराब ऑईलचा वापर करावा.

६. सांडपाण्याचे हौदातील पाणी बदलणे शक्य नसल्यास त्यात गप्पी मासे सोडावेत.

• वैयक्तिक पातळीवर घ्यावयाची जबाबदारीः-

१. एडिस इजिप्टाय डास दिवसा चावतो त्यामुळे रात्री सोबत दिवसासुद्धा डास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मलम,उदबत्त्या,वड्या यांचा वापर करावा.

२. दिवसा व रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करावे.

३. चिकनगुन्या किंवा डेंग्यूचा संशयित रूग्ण आढळल्यास त्वरीत शासकीय रूग्णालयात संपर्क साधावा.

४. धूर फवारणी,औषध फवारणी, अबेटींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

५. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी डेंग्यू किंवा चिकनगुन्याचा संशयित रूग्ण आढळल्यास त्वरीत आरोग्य विभागास कळविणे बंधनकारक आहे.

६. घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
अधिक माहितीसाठी साथ रोग नियंत्रण कक्ष- फोन क्र.: 0240-2990446 येथे अथवा E-mail:dmoabad@rediffmail.com येथे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी आर.बी ढोले यांनी केले आहे.