ताडोबातील गिधाडाचा तामिळनाडूपर्यतचा प्रवास

0
ताडोबातील गिधाडाचा तामिळनाडूपर्यतचा प्रवास

 

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर ‘बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या वतीने ‘जीपीएस टॅग’ लावण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पा’तून सोडण्यात आलेल्या एका गिधाडाने तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य पाच राज्यांमधून झालेला या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला आहे. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एन ११’ असा सांकेतिक क्रमांक असलेले हे गिधाड सध्या तामिळनाडूतील कलसपाक्कम तालुक्यात पोहोचले आहे. निसर्गचक्रात, देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी ‘बीएनएचएस’ गेली अनेक वर्षे काम करीत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हरिणायातील पिंजोर येथे ‘बीएनएचएस’ने एक गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे.

या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. ताडोबात १० पांढऱ्या पुठ्ठ्याची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे हलवण्यात आली होती. त्यांना येथील जटायू संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १० पांढऱ्या पुठ्ठ्याच्या गिधाडांंना ‘जीपीएस टॅग’ लावून ऑगस्ट महिन्यात ताडोबामधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. यामधील ‘एन-११’ या मादी गिधाडाला सोडल्यानंतर तिने ताडोबा ते छत्तीसगड, छत्तीसगड ते गुजरात आणि आणि गुजरात ते तामिळनाडू असा प्रवास केला आहे. ऑगस्ट महिन्यात या गिधाडाला सोडल्यानंतर त्याने २०० किमी अंतर कापून छत्तीसगडमधील नारायणपूर गाठले. तेथे त्याच्यावर उपचार करुन सप्टेंबरमध्ये पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर जवळपास ६०० किमी अंतर कापत या गिधाडाने गुजरात गाठले.

यादरम्यान त्याने महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केले होते. नंतर गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील उच्छल तालुक्यातील जामली गावात हे गिधाड जमिनीवर पडलेले सापडले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करुन पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून प्रवास केला. गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करुन कर्नाटकात प्रवेश केला. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे गिधाड बरेच फिरल्याची माहिती ‘बीएनएचएस’च्या ‘काॅन्झर्वेशन ब्रिडिंग’ तज्ज्ञ काझवीन उमरीगर यांनी दिली आहे. किशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एन-११’ या गिधाडाच्या ताडोबा ते गुजरात या स्थलांतरादरम्यान त्याला दोन वेळा पकडून पुन्हा सोडावे लागले होते. मात्र, गुजरात ते तामिळनाडू या प्रवासादरम्यान त्याला एकदाही पकडावे लागले नाही.

Chandrapur history in marathi
Chandrapur job
Chandrapur in which district
Chandrapur is famous for
Chandrapur distance
Chandrapur tourist places
Chandrapur Pin Code
Chandrapur Map