ताडोबा व्याघ्र पर्यटनात ठरले ”नंबर वन’

0

चंद्रपूर : राज्यात ताडोबा व्याघ्र पर्यटनात पुन्हा एकदा ठरले ”नंबर वन”

चंद्रपूर (Chandrapur), 26 मे,  – ताडोबा-अंधारी प्रकल्प (Tadoba-Andhari Project)हा राज्यात व्याघ्र पर्यटनात पुन्हा एकदा ठरले ”नंबर वन” ठरला आहे. मागील आर्थिक वर्षभरात ४ लाख ५ हजार ८८८ पर्यटकांनी हजेरी लावलेली असून ही ताडोबात आजवरची सर्वात मोठी पर्यटन संख्या ठरली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान प्रकल्पाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या मात्र कमालीची घटली आहे.

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक असून या व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. ताडोबात मागील आर्थिक वर्षभरात ४ लाख ५ हजार ८८८ पर्यटकांनी हजेरी लावलेली असल्याची माहिती समोर आली आहे. ही आजवरची सर्वात मोठी पर्यटन संख्या ठरली आहे. यंदा प्रकल्पाला सर्वाधिक एकूण १४ कोटी २० लाख ३३ हजार ९१३ रुपयांचा महसूल मिळाला आहे. याही महसुलाने मागील सर्व ”रेकॉर्ड” मोडले आहेत हे विशेष. राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण बाब मानली जात आहे. एकीकडे देशी पर्यटकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रकल्पाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. ही बाब चिंता वाढविणारी ठरली आहे.

प्रकल्पात २०२२-२३ मध्ये येथे ६ हजार ७६७ विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. पण यंदा २०२३-२४ मध्ये केवळ ११४ विदेशी पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. दरम्यान या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मार्चपासून आतापर्यंत पर्यटकांची गर्दी प्रकल्पात कायमच आहे.

————

कोणत्या वर्षी किती पर्यटक आले—

वर्ष—पर्यटन संख्या

२०१८-१९ –१ लाख ८१ हजार ४६७

२०१९-२०- २ लाख २२ हजार ९३२

२०२०-२१- १ लाख ६२ हजार ८२२

२०२१-२२ – १ लाख ९७ हजार ५८४

२०२२-२३ – ३ लाख १९ हजार ६६८

२०२३-२४ – ४ लाख ५ हजार ८८८