‘स्वरयात्रे’ने रसिकांना घडवली संगीतमय सफर

0

नागपूर (nagpur), 29 मार्च
स्वरयात्रेने रसिकांना मराठी भक्तिगीते, भावगीते आणि सुमधूर हिंदी गाण्यांची सुंदर सफर घडविली. या सुरेल मैफलीत सभागृहात उपस्थित रसिक अक्षरशः सुरांमध्ये न्हाऊन निघाले.

कर्‍हाडे ब्राह्मण बेनेवोेलेन्ट फाऊंडेशन आणि कर्‍हाडे ब्राह्मण संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने साई सभागृहात लोकप्रिय भावगीते, भक्तिगीते व चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम ‘स्वरयात्रा’चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे पदाधिकारी प्रकाश दीक्षित, शशांक मुळ्ये, संजय कानेटकर, मनीष नवाथे, विवेक खेर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

गाण्याच्या सुंदर प्रवाहाला ईशा रानडे यांनी गायलेली ज्ञानेश्वरांची रचना ‘मोगरा फुलला’ याने सुरुवात केली. तसेच ‘रूणुझुणु रूणुझुणु रे भ्रमरा’ ही रचनाही त्यांनी छान सादर केली. यानंतर सारंग जोशी यांनी ‘आम्ही ठाकरं ठाकरं’, ‘मधुबन में राधिका’, तसेच योगेंद्र रानडे यांनी सादर केलेल्या ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ या गीताने रसिकांना एका वेगळ्या भावविश्वात नेले. त्यांनीच ‘दिल का भंवर’ हे गीतही सादर केले. तसेच, मी रात टाकली, ऋतू हिरवा, संधीकाली या अशा, मै जिंदगी का साथ, तेरे मेरे सपने, एहसान तेरा, अरे यार मेरी, हंसता हुआ नुरानी चेहरा, चांदण्यात फिरताना, माझ्या सारंगा, मी डोलकर, शुक्रतारा मंद वारा, श्रावणात घननीळा, खोया खोया चांद, कुहू कुहू बोले कोयलिया, ये रात भीगी भीगी, गोमू संगतीनं, मल्हारवारी, जांभूळ पिकल्या झाडाखाली, तुम जो मिल गये हो, मेरे घर राम आए अशी एकाहून एक मधुर गाणी गायक कलाकारांनी सादर करून रसिकांना रिझविले.

या गायक कलाकारांना की-बोर्डवर परिमल जोशी यांनी, गिटारवर ऋग्वेद पांडे, ऑक्टोपॅडवर महेंद्र वातुलकर, तालवाद्य विक्रम जोशी, तबल्यावर अशोक टोकलवार या वाद्यवृंदांनी उत्तम साथ दिली. गाणी सादर करण्यापूर्वी प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी आपल्या ओघवत्या वाणीने सांगत उत्कृष्ट निवेदनाने वृषाली देशपांडे यांनी रसिकांनी खिळवून ठेवले. कार्यक्रमाला सिद्धीविनायक पब्लिसिटीचे समीर पंडित यांचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.