बदलीच्या ठिकाणावर रुजू न झालेल्या ११ अधिकाऱ्यांचे निलंबन

0

मुंबई : बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या ११ अधिकाऱ्यांवर महसूल महसूल विभागाने थेट निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये आठ तहसीलदार आणि चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर महसूल विभागातील बदलीचे आदेश निघालेले बहुसंख्य अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्याचे सूत्रांची माहिती आहे.
अधिकारी हे बदलीनंतर आपल्या जागेवर रुजू न होता मनासारख्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी ही कारवाई हा एक इशारा असल्याचे मानले जाते. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंह मोहिते यांचा प्रामुख्याने समावेश आहे. निलंबित तहसीलदारांमध्ये बी. जे. गोरे (एटपल्ली, गडचिरोली), सुनंदा भोसले (नागपूर), पल्लवी तभाने (वर्धा), बालाजी सूर्यवंशी (अपर तहसीलदार (नागपूर), सुरेंद्र दांडेकर (धानोरा, गडचिरोली), विनायक थविल (वडसा देसागंज, गडचिरोली), तसेच नाशिक विभागातील सुचित्रा पाटील (करमणूक शुल्क अधिकारी) यांचा समावेश आहे. अधिकारी रूजू होत नसल्याने विदर्भ व मराठवाड्यातील पदे रिक्त रहात होती. मात्र, या कारवीईमुळे अधिकारी तातडीने नियुक्तीच्या जागी रूजू होतील, अशी अपेक्षा आहे.