

दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत समित्या, जिल्हा परिषदा उभारल्या. त्या माध्यमातून पुढे आलेलं नेतृत्व हे राज्यात आणि देशात विविध पदापर्यंत पोहोचल्याचं आपण पाहिलं आहे.
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, आता राजकीय पक्ष कामाला लागले असून दिवाळीपूर्वीच राज्यात धमाका होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी देखील नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली. पहलगाम येथे आपल्या देशातील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे ही मागणी होती. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते काम केले, पाकिस्तानला (Pakistan) चोख उत्तर दिले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या सैन्याने चोख उत्तर देत जगाला भारताची ताकद दाखवून दिली, त्यांना मी सॅल्युट करतो, असे अजित पवारांनी नाशिक येथील सभेत बोलताना म्हटले.तुम्ही मजबुतीने सरकारच्या मागे उभं राहिले पाहिजे, असेही अजित पवारांनी म्हटले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
राज्यात सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी, इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत समित्या, जिल्हा परिषदा उभारल्या. त्या माध्यमातून पुढे आलेलं नेतृत्व हे राज्यात आणि देशात विविध पदापर्यंत पोहोचल्याचं आपण पाहिलं आहे. खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 2022 मध्ये व्हायला पाहिजे, पण आता 2025 उजाडला आहे. आता, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे अजित पवारांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यात निवडणुका घ्या, असे निर्देश दिल्याचा संदर्भ अजित पवारांनी आपल्या भाषणातून दिला. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असेही त्यांनी म्हटले. पूर्वीप्रमाणेच ओबीसींना 27 टक्के आरक्षणाच्या जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे, या निवडणुकांमध्ये विविध कार्यकर्त्यांना उभारी मिळेल, त्यांनी काम करुन दाखवावं, असे आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.
कळवण, सुरगाणा, पेठ हा डोंगरी, आदिवासी भाग आहे. येथील एज्युकेशन सोसायटीमुळे इथं अनेक मुलं घडत आहे, त्याचं मी अभिनंदन करतो. 35 वर्षांपासून मी खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. मी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना मोठा निधी शिक्षण विभागाला देत असतो. सर्व पुढची पिढी घडावी यासाठी ह्या शिक्षण संस्था सुरू राहणे गरजेची आहे. विविध संस्थांनी पुढे येऊन निधी द्यावा असे आवाहन करा, मी पण करेल असेही अजित पवारांनी संस्थांच्या आर्थिक अडचणीसंदर्भात बोलताना म्हटले.
शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञान अवगत करावे
काळानुसार बदल गरजेचा आहे, सध्या AI कृत्रिम बुद्धिमत्ता ही टेक्नॉलॉजी विकसित होत आहे. मुलांनी आणि पालकांनी त्याचं शिक्षण घेतले पाहिजे. विविध प्रकारच्या क्षेत्रात कामगिरी करण्याची गरज आहे. मुलामुलींनी याचा फायदा घेतला पाहिजे. ह्या भागात विविध पिकांची शेती होते, मी येताना पाहिले. सरकारकडून ऊस, कापुस, सोयाबीन, कांदा, फळबागा यांसाठी योजना राबविण्यात येत आहेत. AI साठी मी 500 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. याच AI पासून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढत आहे. पाण्याची, खतांची बचत होत असून उत्पादन दुपटीने वाढल्याचे उदाहरण देखील अजित पवारांनी दिले.