

जळगाव(Jalgaon) १२ जुलै :- जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथे 500 मेगावॅटचे दोन थर्मल पॉवर स्टेशन उभारण्यात आले. हे करताना वृक्षतोड करण्यात आली. करारनामा करताना वृक्ष लागवड करणार असे त्यांनी कबूल केले. पण संच सुरू झाल्यानंतरही त्यांनी वृक्ष लागवड केली नाही. त्यावर कठोर कारवाई करणार का, असा प्रश्न भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी (ता. 12) विधानसभेत केला.
आमदार सावकारे यांच्या प्रश्नाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी एकदम एनर्जेटिक उत्तर दिले. ते म्हणाले, करारनाम्यात कबूल केल्यानंतर आणि थर्मल पॉवर स्टेशन पूर्ण झाल्यानंतरही त्या लोकांनी झाडे लावली नसतील, तर त्यांना त्यांच्याच पॉवर स्टेशनमधून जोरदार करंट दिला पाहिजे. तुम्ही थर्मल पॉवर स्टेशनची माहिती द्या. लगेच त्याची चौकशी लावून ऊर्जा मंत्र्यांना पत्र देतो आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करतो, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
कठोर कारवाई होणार
सरकारने अश्याप्रकरे लोकांना केवळ दंड ठोठावूच नये. कारण सरकार थातूर मातूर दंड ठोठावते आणि ते गब्बर झालेले लोक दंड भरून मोकळे होतात. त्यांच्यावर कारवाईच झाली पाहिजे. पर्यावरणाचा हास करणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत मोकळे सोडता कामा नये, असेही आमदार सावकारे यांनी म्हटले. त्यावर केवळ दंड ठोठावून सोडणार नाही, तर निश्चित कठोर कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी उत्तरादाखल सांगितले.
जळगाव जिल्ह्यात तरसोत ते चिखली हा मगामार्ग तयार करण्यात आला. या महामार्गाचे कामही सुरू झाले नव्हते. तेव्हा त्याच परिसरात हजारो झाडे तोडली. त्यानंतर ते टेंडर रद्द झाले आणि ती तोडलेली झाडे तशीच राहिली. तीन चार वर्षांनंतर नवे टेंडर काढण्यात आले. महामार्ग तर तयार झाला पण कंत्राटदारांनी तोडलेल्या झाडांच्या 10 टक्केही झाडे लावली नाहीत. त्यामुळे पर्यावरणाची हानी झाल्याचा मुद्दाही आमदार सावकारे यांनी उपस्थित केला.
सुरूवातीला या महामार्गाच्या कामाचे टेंडर एल अँड टी कंपनीला देण्यात आले होते. त्यांच्याकडून ते काम झाले नाही. निर्धारित वेळेत काम पूर्ण झाले नाही, तर ते टेंडर रद्द होते, असा एनएचएआयचा नियम आहे. त्यानंतर नवीन टेंडर होण्याची शक्यता असते. नवीन टेंडर घेतलेल्या कंपनीने जर नियमानुसार झाडे लावली नसतील, तर त्या कंपनीवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला दिली.
खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकिर यांनी वनउद्यानाची मागणी केली. वनउद्यान दिले तर गावकरी त्याची जोपासना करतील. वनउद्यान झाले तर पर्यंटन वाढेल, असे ते म्हणाले. त्यावर आमदार तापकिर यांचा एबी फॉर्म मी दिलेला आहे. ते माझ्यासाठी खास आहेत. त्यांनी येथे उपप्रश्न केला नसता आणि केवळ निवेदन दिले असते, तरी त्यांचे काम झाले असते. पण सभागृहात शब्द घेऊन कदाचित त्यांना खात्री करून घ्यायची असेल. त्यांच्या वनउद्यानासाठी नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.