

मी फक्त काॅंग्रेसचा
काळा इतिहास सांगितला!
चंद्रपूर (Chandrapur) :त्या भाषणात मी फक्त काॅंग्रेसचा काळा इतिहास सांगितला. समाजातील महिलांपासून तर विविध अन्य घटकांना हा पक्ष कशी वागणूक देतो, हे सांगण्याचा आणि या घटकांचा त्या पक्षात सातत्याने होणाऱ्या अपमानाचे वास्तव या निमित्ताने जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न मी केला. मात्र, काॅंग्रेसच्या सोशल मीडिया सेलने त्या भाषणाचा त्यांना पाहिजे तसा दुरुपयोग करत, पुन्हा एकदा महिलांचा अपमान केला असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या चंद्रपुरात झालेल्या जाहीर सभेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे. त्या कथित वादग्रस्त भाषणाबाबत शंखनादशी बोलताना सुधीर मुनंगटीवार यांनी, काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलने त्या भाषणातील केवळ त्यांना सोयीचा असलेला भाग ठेवून, उरलेले महत्त्वाचे संदर्भ कट करून ती क्लिप व्हायरल केली. माझ्या वक्तव्याला आणीबाणी आणि शीख दंगलीचा संदर्भ होता. मी काॅंग्रेसचा खरा पण काळा इतिहास सांगितला. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.