
लंडनला रवाना होण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवारांनी शिवरायांना अभिवादन केले
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ती करार तत्त्वावर महाराष्ट्रात आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार ब्रिटनला रवाना झाले आहेत.राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं.यावेळी उपस्थित शेकडो शिवप्रेमींसोबत त्यांनी संवाद साधला. मुनगंटीवार म्हणाले की, हजारो सूर्यांचं तेज असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्या वाघनखांबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, ती महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार होणार आहे. त्या कराराची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुनगंटीवार ब्रिटनला रवाना झाले. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी वाघनखं मुंबईत आणण्यात येतील. पुढे राज्यभर विविध ठिकाणी ती ठेवली जाणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत वेळापत्रकच दिलं आहे.
तीन वर्षांसाठी भारतात:
लंडन येथील संग्रहालयात असलेली वाघनखे साधारण तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही वाघनखे कायमस्वरूपी भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यासाठी वाघांची एक जोडी ब्रिटनला देण्याची तयारी आपण दर्शविली असून यात एक नर आणि एक मादी वाघाचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
चार संग्रहालयांत पाहता येणार वाघनखे:
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर येथील चार वेगवेगळ्या संग्रहालयांत ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नागपूर येथील सेंट्रल म्युझियम, कोल्हापूरमधील द लक्ष्मी विलास पॅलेस आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा समावेश करण्यात आला आहे.