
नागपूर | “आधी फाशी द्या म्हणायचे आणि आता तेच लोक पोलिसांच्या जिवावर उठलेत,” असे म्हणत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बदलापूर प्रकरणावर जोरदार टीका केली आहे. दृष्ट बुद्धीचा बलात्कारी असलेल्या व्यक्तीने पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्याच्यावर सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. “प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही विरोधक सहानुभूती व्यक्त करतात, हे विचित्र आहे,” असे ते म्हणाले.
मुनगंटीवारांनी विरोधकांना उद्देशून विचारले, “पोलिसांवर विश्वास ठेवायचा नाही का? पोलीस राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत.” ते पुढे म्हणाले, “मतांसाठी विरोधक काहीही करू शकतात, याचा भरोसा नाही.”
अमित शाह यांच्या निवडणूक निरीक्षणाबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “अमित शाह निवडणुकीच्या तयारीत सूक्ष्म निरीक्षण करतात आणि प्रत्येक ठिकाणी सकारात्मक परिणाम साधतात. त्यांना दिलेल्या जबाबदारीत भाजपला यश मिळत आले आहे.”
काही अधिकाऱ्यांच्या नकारात्मकतेवर टीका करताना ते म्हणाले, “मोजके अधिकारी नकारात्मक आहेत. त्यामागील कारण स्पष्ट सांगता येत नाही. कदाचित मविआच्या प्रेमात असावेत. मात्र, मुख्यमंत्री म्हणाले आहेत की लोकहितासाठी आचारसंहितेची वाट पाहण्याची गरज नाही.”
सांस्कृतिक धोरण आणि सिद्धिविनायक मंदिर
नवीन सांस्कृतिक धोरणाच्या बाबतीत मुनगंटीवारांनी स्पष्ट केले की, “आदिवासी कलाकारांसह इतर अनेक घटकांसाठी 10 तरतुदी केल्या आहेत. फक्त धोरण नाही तर स्थायी समिती स्थापन करून याची अंमलबजावणी केली जाईल.”
सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या बाबतीत व्हिडिओ प्रकरणावर ते म्हणाले, “सरकार याची चौकशी करेल.”
नाना पटोले आणि अजित पवार यांच्यावर टीका
नाना पटोले यांच्यावर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले, “सवंग लोकप्रियतेसाठी ते संघावर आरोप करतात. मुख्यमंत्री होण्याची त्यांना घाई झाली आहे.” अजित पवार यांच्याबाबत बोलताना मुनगंटीवारांनी म्हटले, “मविआ अजित पवारांबाबत खोटं नेरेटिव्ह पसरवत आहे. आमची आणि अजित पवारांची भूमिका सोबत निवडणूक लढण्याची आहे.
मविआवर टीका करताना ते म्हणाले, “मविआने आधी अजित पवारांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. आता दुसरा खोटा नेरेटिव्ह तयार केला आहे. त्यांना ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्यात गोल्ड मिळेल.”