लोकसभा थेट लढतीत सुधीर मुनंगटीवारच मारणार बाजी!

0

 

नागपूर (Nagpur):  (शंखनाद चमू) राज्याच्या राजकारणातील भाजपचे हेवीवेट नेते, मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आणि वन, सांस्कृतिक ते अर्थमंत्रीपदापर्यत अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारे उत्तम वक्ता, कुशल संघटक सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्याशी थेट लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर राजकीयदृष्ट्या चर्चेत आहे. यापूर्वी, राजकारणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले सुधीर मुनंगटीवार 33 वर्षानंतर पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. काँग्रसचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोकर यांच्या तिकिटासाठी मोठा संघर्ष चालला. जातीय राजकारण हा त्यांचा प्रमुख आधार असताना, विकासाच्या मुद्यावर, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी जनतेची साथ आपल्यालाच मिळेल असा विश्वास भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत चंद्रपूरमध्ये काटे की टक्कर.. असल्याची स्थिती आहे. मात्र, या लढतीत बाजी मुनगंटीवारच मारणार असेही म्हटले जात आहे.
चंद्रपूर लोकसभेसाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचेसमवेत ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे, डॉ गजेंद्र आसुटकर(यवतमाळ) इच्छुक होते. मात्र यंदा पक्षाने हंसराज अहीर यांच्या ऐवजी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी दोन वेळा (1989 व 1991)चंद्रपूर लोकसभा लढविली आहे. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. ‘अबकी बार 400 पार’चा नारा भाजपाने दिला असून, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. गेल्यावेळी काँग्रेसला एकमेव चंद्रपूरची जागा मिळाली, यावेळी भाजपाला चंद्रपूर लोकसभा खेचून आणायची आहे. मुनगंटीवार यांना राजकीय,सामाजिक व प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. सुक्ष्मनियोजन, अनोखी कार्यशैली व सर्वमान्य नेतृत्व या पार्श्वभूमीवर भाजपाने मुनगंटीवार यांना जबाबदारी दिली आहे. तत्पूर्वी मुनगंटीवारांनी, जाहीरपणे राज्याच्या राजकारणातच आपल्याला रस असल्याचे सांगून लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. परंतु भाजपाला हेविवेट नेत्याच्या रूपाने चंद्रपूर लोकसभेची जागा खेचून आणायची असल्याने मुनगंटीवार यांना मैदानात उतरावे लागले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांची मुलगी शिवानी यांनी अचानक चंद्रपूर लोकसभेच्या मैदानात उडी घेतली. त्यामुळे काँग्रेसमध्ये बरीच रस्सीखेच पहायला मिळाली. शिवाणी लोकसभेसाठी आग्रही असल्यामुळे प्रतिभा धानोरकर यांना दिल्लीत जोर लावावा लागला. कुणबी समाजाचे या क्षेत्रात मोठे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरणार आहे. मुनगंटीवार सहाव्यांदा विधानसभेत चंद्रपूरचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता हा बुलंद आवाज संसदेत जनसामान्यांच्या प्रश्नांचा शंखनाद करणार, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.