सावंगी मेघे रुग्णालयात केले यशस्वी प्रत्यारोपण

0
भारतातील सर्वात लहान रुग्णावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

वर्धा – सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिशल्यचिकित्सा विभागात १३ वर्षीय बालिकेवर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. हिप रिप्लेसमेंट करण्यात आलेली ही भारतातील सर्वात लहान रुग्ण असून यापूर्वी मार्च २०२३ मध्ये दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये १४ वर्षीय कुमारवयीन मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची नोंद आहे, असे अस्थिशल्यचिकित्सक डॉ. हितेंद्र वांबोरीकर यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या चिकाळा गावातील निवासी अलेशा किशन मनपूर्वे ही १३ वर्षांची मुलगी फळे तोडताना शेतातील झाडावरून खाली पडली. खाली पडल्यामुळे तिला दुखापत झाली. मात्र फार मोठी इजा झालेली नाही असे समजून तिच्यावर जवळच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. आठव्या वर्गात शिकणारी अलेशा हुशार विद्यार्थिनी म्हणून शाळेत ओळखली जाते. तात्पुरत्या उपचाराने तिला बरे वाटत असले तरी या अपघातानंतर तिला वर्गात बसताना त्रास होऊ लागला. शाळेत होणारा त्रास तिच्या शिक्षकांच्याही लक्षात आला. त्यांनी अलेशाच्या वडिलांना शाळेत बोलावून मुलीला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली.
अलेशाच्या वडिलांनी नांदेड येथील एका खाजगी दवाखान्यात तिला दाखविले व डॉक्टरांच्या सल्ल्याने तेथे एमआयआर करून घेतला. एमआयआर तपासणीत अलेशाच्या कंबरेतील खुब्याच्या सांध्यांमधील हाडाच्या बॉलला इजा झाल्याचे दिसून आले. ही शस्त्रक्रिया वयाच्या विशीनंतरच होईल आणि शस्त्रक्रियेसाठी लाखाने खर्च येईल, असे सांगण्यात आल्यामुळे अलेशाचे वडील चिंताग्रस्त झाले. काही दिवसांपूर्वी या भागातील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव कोहळीकर यांनी सावंगी (मेघे) रुग्णालयाचे एक शिबीर आपल्या परिसरात घेतले असल्याने त्यांनी अलेशाच्या वडिलांना सावंगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात अस्थिरोगतज्ञ डॉ. हितेंद्र वांबोरीकर यांनी अलेशाची तपासणी केली तसेच वैद्यकीय रिपोर्ट बघून तिच्या वडिलांना आगामी उपचारांबाबत माहिती दिली. या दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व येऊ नये म्हणून हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया हाच पर्याय असल्याचे सांगितले. लहान वयाच्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसाठीही आव्हान असून हिप रिप्लेसमेंटसाठी लागणारे कृत्रिम सांधे व अन्य सामग्री सहसा उपलब्ध नसते. ही सामग्री उपलब्ध करण्यासही वेळ लागतो. तसेच पालकांनी परवानगी दिली तरच या शस्त्रक्रियेसाठी पुढील प्रक्रिया केली जाते, याची पूर्वकल्पना पालकांना देण्यात आली.
अलेशाच्या पालकांनी परवानगी दिल्यानंतर व प्रत्यारोपणाची सामग्री उपलब्ध होताच डॉ. हितेंद्र वांबोरीकर यांनी बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. करुणा ताकसांडे, सहाय्यक अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रतिम रॉय, डॉ. विशाल कलबुर्गी यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेली. भरतीदरम्यान मनपूर्वे कुटुंबाला कुठलाही रुग्णालयीन खर्च लावण्यात आला नाही. तसेच, ही महागडी शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आली. अत्यंत कमी वयाच्या रुग्णावर करण्यात आलेली ही देशातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. वांबोरीकर यांनी सांगितले. तर, प्रशासकीय सहकार्यासाठी आलेशाच्या परिवाराने सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर व मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांचे आभार मानले.