

सुभाषजींनी भूमातेवर केलेल्या सश्रद्ध प्रेमाची पावती म्हणजे पद्मश्री पुरस्कार! –सुनीलजी देशपांडे
यवतमाळ (Yavatmal) : सुभाष शर्मा यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे ठरविले तेव्हा सुरुवातीला त्यांचा उपहास झाला. अनेकांनी विरोध केला. लोकांनी त्यांना वेडे ठरविले; परंतु कुणाच्याही म्हणण्या – बोलण्याकडे लक्ष न देता ते माती व पाण्याची सेवा करीत राहिले. त्यांनी आपल्या सिद्धांतासाठी सर्व प्रकारचे परिश्रम घेतले. शेताच्या बांधाबाहेर चप्पल काढून शिवारफेरी मारायला लावणाऱ्या सुभाषजींनी काळ्या आईवर श्रद्धापूर्वक केलेल्या प्रेमाची पावती म्हणजे भारत सरकारने जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार होय, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अ. भा. सहसंपर्कप्रमुख सुनीलजी देशपांडे यांनी येथे केले.
दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दीनदयाल प्रबोधिनीतील भगवान बलराम सभागृहात आयोजित सत्कार समारंभ ते बोलत होते. राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, माजी मंत्री मदन येरावार, दीनदयालचे अध्यक्ष नरहर देव, उपाध्यक्ष ज्योती चव्हाण, सचिव विजय कद्रे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुभाषजींच्या पद्मश्रीचा यवतमाळातील शेतकऱ्यांना आनंद – ना. संजय राठोड
शेती, माती व पाणी यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या सुभाषजींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल यवतमाळातील शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या नकारात्मक वातावरणात त्यांनी जिद्दीने नफ्याची शेती करून शेतीला सन्मान मिळवून दिला, असे गौरवोद्गार यावेळी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांनी बोलताना काढले. दीनदयाल सेवा प्रतिष्ठान शेतकऱ्यांना विषमुक्त शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करीत आहेच. शासन यंत्रणेला सोबत घेऊन आपणही विषमुक्त शेतीच्या प्रसारासाठी प्रयत्न करू. त्यासाठी सुभाष शर्मा व दीनदयाल प्रबोधिनीकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
सुभाषजींचे काम हे निसर्गाचा समतोल साधणारे – माजी मंत्री मदन येरावार
सुभाषजी शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार झाल्याने यवतमाळ सोबतच विषमुक्त शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे. याचे महत्त्व जसे दीनदयाल संस्थेला आहे, तसेच शेतीवर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच आहे. पुन्हा एकदा ‘उत्तम शेती’कडे पुन्हा वळविणारे आहे. केंद्र व राज्य सरकार नदीजोड प्रकल्प, स्मार्ट शहरासोबत स्मार्ट व्हिलेजेस सारखे असंख्य उपक्रम राबवित आहे. समाजालाही आपली मानसिकता बदलवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुभाषजी प्रमाणे शेतीवर श्रद्धा ठेवून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री मदन येरावार यांनी यावेळी केले.
नैसर्गिक शेती ही आता चळवळ व्हावी – दीपक तामशेट्टीवार
ज्ञान विज्ञानात पुढारलेला भारत इंग्रजांच्या कुटिल नीतीमुळे कंगाल झाला. इथली धान्य कोठारे रिकामे करून इंग्रज गेले. अशावेळी देशाला हरितक्रांतीची गरज होती; परंतु आज रासायनिक खते आणि कीटकनाशकांमुळे शेती व मातीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी सुभाषजींप्रमाणे नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल. एकट्या दुखण्याचे काम नव्हे. सामान्य शेतकऱ्यांची ही चळवळ व्हावी असे उद्गार रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी यावेळी बोलताना काढले.
आपल्या पुरस्काराचे श्रेय माती, पाणी, झाडं नि जीवजंतूंना -सुभाष शर्मा
आपण कधीही कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज केला नाही. ते करायची गरजच नसते. आपण आपले काम निष्ठेने करायचे असते. मला प्राप्त झालेला हा पद्मश्री पुरस्कार सर्वार्थाने माझ्या काळ्या आईचा, पाण्याचा, शेतातील झाडांचा, जीव जंतूंचा, पशुपक्षी, पाखरं आणि माझ्यासोबत चाळीस वर्षांपासून घाम गाळणाऱ्या शेतमजुरांचा आहे. दीनदयाल परिवाराने माझी शेती पद्धती उचलून धरली, समजून घेतली आणि त्यानुसार इतरही शेतकऱ्यांना प्रवृत्त व प्रशिक्षित केले त्यामुळे या श्रेयाचे वाटेकरी दीनदयाल परिवार देखील आहे असे भावोत्कट उद्गार सत्काराला उत्तर देताना सुभाष शर्मा यांनी काढले. आगामी काळात वातावरणातील बदल आपण मोठ्या प्रमाणात अनुभवणार आहोत. त्यासाठी शेतीचे मूळ स्वरूप जपण्याची गरज आहे. समाजाला शुद्ध हवा, पाणी आणि अन्न मिळालं पाहिजे. ही जबाबदारी शेतकऱ्यासोबतच समाजाचीही आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दीनदयालचे अध्यक्ष नरहर देव यांनी प्रास्ताविकात सुभाषजींच्या मार्गदर्शनात संस्थेत सुरू असलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानपत्राचे वाचन संस्थेचे सहसचिव विवेक कवठेकर यांनी केले. साक्षी काळे हिने वैयक्तिक गीत म्हटले. कार्यक्रमाचे संचालन मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडकर यांनी तर आभार प्रदर्शन शाश्वत कृषी विकास प्रकल्पाचे अध्यक्ष बाबा कपिले यांनी केले. संस्थेचे सहसचिव चंद्रशेखर बिडवाई व कोषाध्यक्ष धनंजय चौहान यांनी स्वागत केले. मधुरा वेळूकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पोर्टेट रांगोळीने वेधले लक्ष
सत्कार समारंभाच्या ठिकाणी विदर्भातील चित्रकार, रांगोळीकर अरुण लोणारकर व संजय सांबजवार यांनी सुभाष शर्मा यांची पोर्ट्रेट रांगोळीची काढली होती. ती पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली.
विविध संस्थांनी केला सन्मान
सुभाष शर्मा यांना पद्मश्री घोषित झाल्याबद्दल यावेळी विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, यवतमाळ अर्बनचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय पांडे, नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, सेवा समर्पण संस्थेचे सचिव अनंत कौलगीकर, केशवस्मृती वाचनालयाचे विलास देशमुख व अमित भिसे, भारतीय जनता महिला मोर्चाच्या कीर्ती राऊत व शैला मिर्झापुरे, कपिला गोरक्षण संस्था दिग्रसचे मनोज सरवय्या, सेवा व शोध चॅरिटेबल ट्रस्टचे एन् टी. जाधव व राजीव चव्हाण, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे इरफान मलनस, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, डॉ. ताराचंद कंठाळे, वैशाली बेडेकर, आशुतोष ओक, माजी नगरसेवक दत्ता कुलकर्णी, दर्शना व मनोज व्यास इत्यादींचा समावेश होता.