


सोलापूर(Solapur) , 9 मे समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ११ पंचायत समिती स्तरावरुन मिळालेल्या मागणीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाकडे ई बालभारती पोर्टलवर चार लाख पाच हजार १०० पुस्तक संचाची मागणी नोंदवली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, शासकीय व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या चार लाख पाच हजार १०० इतकी आहे. त्यांच्यासाठी तेवढ्या पाठ्यपुस्तक संचाची मागणी नोंदवण्यात आली आहे. येत्या म्हणजे २०२४ -२५ या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे.
त्यासाठी शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही मागणी करण्यात आली आहे. ही पुस्तके एकात्मिक स्वरुपाची असून मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमांचा यात समावेश आहे. पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तरावर पोहोचवली जाणार आहेत.
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळेतील गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांत त्याचा सकारात्मक बदल दिसून येईल.