विद्यार्थ्यांना मिळणार ‘अपार कार्ड’

0


Automated Permanent Academic Registry :
शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधा, शाळाबाह्य विद्यार्थी व अर्ध्यातून शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांच्या आणण्यासाठी आता ‘अपार’ (ॲटोमेटेड पर्मनंट ॲकेडमिक रेजिस्ट्री) आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘डिजीलॉकर’च्या मदतीने ‘अपार’मधून सर्व शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या नोंदी पाहता येतील.

आधारकार्डच्या धर्तीवर इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांना आता अपार आयडी तथा कार्ड दिले जाणार आहे. सुरवातीला नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ते कार्ड देण्यात येणार होते, पण आता सर्वांनाच दिले जात आहे. त्यासाठी पालकांचे संमतीपत्र लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या चार हजार ७१६ शाळांमधील सात लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना ते अपार कार्ड दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकांना ‘अपार’ आयडीसंदर्भात सांगून त्यांचे संमतीपत्र घ्यायचे आहे. त्यासाठी अजून मुदत नाही, पण ‘एक राष्ट्र एक ओळखपत्र’ या धोरणानुसार देशातील सर्वच विद्यार्थ्यांना ते कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक कागदपत्रांऐवजी आता या कार्डवरच विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे.

सध्या दिवाळी सुटीनंतर शाळा सुरु झाल्यावर वर्गशिक्षक, मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ‘अपार’ कार्डसाठी पालकांकडून संमतीपत्र घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.