

छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये “व्याख्यानमाला – दुसरे पुष्प” संपन्न
चंद्रपूर (Chandrapur):- ‘सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे’ ‘आपल्या भोवतालच्या मुलांविषयी सतत जागरूकता बाळगा. विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता उलट धाडसाने चुकीच्या गोष्टींना विरोध करावा ‘ असे आवाहन छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी विद्यार्थी तथा महाराष्ट्र पोलीस विभागातील अधिकारी परवीन पठाण यांनी व्यक्त केले.
छोटूभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर माजी विद्यार्थी संघातर्फे माजी विद्यार्थी कै. स्वप्नील महावादीवार स्मृतीप्रित्यर्थ आयोजित “व्याख्यानमाला – दुसरे पुष्प” हा प्रेरणादायी कार्यक्रम शनिवारी (दि. ३० ऑगस्ट २०२५) सकाळी शाळेच्या पटांगणात उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व. छोटूभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत (वैद्य) मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर, निबांळकर सर, कुमरे मॅडम, तसेच माजी विद्यार्थी आशिष धर्मपुरिवार, जितेंद्र मशारकर, धीरज साळुंके, सागर कुंदोजवार यांची उपस्थिती होती.
या व्याख्यानात “सायबर क्राईम व लहान मुलांवर होणारे अत्याचार – जागरूकता आणि उपाय योजना” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेची माजी विद्यार्थिनी व महाराष्ट्र पोलीस विभागातील अधिकारी परवीन पठाण यांनी प्रमुख प्रवक्त्या म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या अनुभवातून त्यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, संशयास्पद घटनांची तक्रार करण्याची पद्धत, तसेच बालकांवरील अत्याचाराविरोधातील कायदेशीर तरतुदी या संदर्भात मार्गदर्शन केले.
त्यांच्या ओघवत्या व वास्तववादी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शंका समाधान करून घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, अशा व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सजगतेची बीजे रोवली जातील आणि ते सुजाण नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत मॅडम यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी ॲड. आशिष धर्मपुरीवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री पडोळे सर यांनी केले. छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, “व्याख्यानमाला” मालिकेतील हे दुसरे पुष्प सर्वार्थाने यशस्वी ठरले.