

कोल्हापूर:- सिंधुदुर्गातील (Sindhudurg) राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदर प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी कोल्हापूरमधून ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. अन्य आरोपी जयदीप आपटे हा सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेनंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठमधील घरी जाऊन चौकशी केली. या चौकशीनंतर आता कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटीलला ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला मालवण पोलिसांकडे सुपूर्द केले जाईल. तिथे त्याची कसून चौकशी केली जाईल. या चौकशीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी आणखी कोणती नवीन माहिती, नवीन खुलासे समोर येतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केवळ पुतळ्यासाठीच्या चबुतर्याचे डिझाईन तयार करुन दिले होते – चेतन पाटील
चेतन पाटील हा बांधकाम सल्लागार म्हणून सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम करत होता. त्याने केलेल्या दाव्यानुसार पुतळ्यासाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता. त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन दिले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झालेले नाही, असा दावा चेतन पाटील याने केला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीनं केलं होतं, असं चेतन पाटीलनं स्पष्ट केलं होतं.