काश्मीरमध्ये २६ पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध!

0

दि. २७.०४.२०२५

प्रसिद्धीसाठी!

भारताने इस्रायल प्रमाणे आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकवा! — हिंदु जनजागृती समितीची मागणी

(Nagpur):नागपूर, २७ एप्रिल – उरी, पठाणकोट, पुलवामा यांसारख्या आतंकवादी हल्ल्यांना ठोस प्रत्युत्तर दिल्यानंतरही भारतातील आतंकवाद संपलेला नाही, हे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण आतंकवादी हल्ल्यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी आतंकवाद्यांनी पर्यटकांचे हिंदू अशी ओळख पटवून २६ निष्पाप पर्यटकांची अमानुष हत्या केली. यामध्ये एका नवविवाहित महिलेच्या डोळ्यांसमोर तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हा प्रकार केवळ आतंकवाद्यांच्या क्रौर्याचे प्रदर्शन नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर झालेला थेट आघात आहे. फक्त निषेध पुरेसा नाही, तर भारत सरकारने इस्रायलचे उदाहरण घेऊन आतंकवाद्यांवर आणि त्यांच्या पालक पाकिस्तानवर कठोर लष्करी कारवाई केली पाहिजे, अशी जोरदार मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती, नागपूर यांच्या वतीने व्हेरायटी चौक, नागपूर येथे आयोजित ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’मध्ये करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, लोक जागृती मोर्चा, सनातन संस्था आणि अन्य संघटनांनी सहभाग घेतला. लोक जागृती मोर्चाचे अध्यक्ष अधिवक्ता रमण सेनाड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित पोलके अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे यांनी आंदोलनाला संबोधित केले.

या हल्ल्यात विविध राज्यांतील पर्यटकांनी हौतात्म्य पत्करल्याने आतंकवाद्यांचा उद्देश संपूर्ण देशात भीती पसरवण्याचा असल्याचे स्पष्ट होते. या नरसंहाराचे जे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाली आहेत, ती मानवतेलाही लज्जास्पद वाटावी अशी आहेत. गेल्या काही काळात हिंदु व्यावसायिकांवर, कर्मचाऱ्यांवर आणि काश्मिरी हिंदूंवर सातत्याने हल्ले होतात आहेत. त्यामुळे या हत्याकांडामध्ये स्थानिक संघटना, नेते, राजकीय पक्ष व प्रशासनातील व्यक्तींचा सहभाग आहे का, याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

एकंदरित, काश्मीरमधील परिस्थिती आणि तेथील नेत्यांचे राष्ट्रविरोधी वक्तव्य पाहता, तातडीने काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करावे. काश्मीर खोऱ्यात व्यापक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून आतंकवाद्यांचा पूर्णतः नाश करावा. ज्या प्रदेशांतून सातत्याने आतंकवादी हल्ले होत आहेत, तेथे कायमस्वरूपी लष्करी छावण्या उभाराव्यात. काश्मीरमध्ये उरलेल्या हिंदु पर्यटकांची, व्यावसायिकांची व काश्मिरी पंडितांची रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा योजना तातडीने अमलात आणावी. तसेच पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची पुनःघोषणा करून त्याचे विलिनीकरण तातडीने सुरू करावे, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या सर्व मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे.