

अतिसार अर्थात डायरिया संसर्ग झाल्यास त्यात बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी डायरीयामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहोचविण्यासाठी ‘स्टॉप डायरीया’ हे अभियान राबविण्यात येत आहे. जाणून घेऊ या ‘स्टॉप डायरीया’ या अभियानाबाबत…
अभियानाचे घोषवाक्य ‘अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊन साथ’
उन्हाळा व पावसाळा या कालावधीत तसेच पूर, नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जावे लागते. त्यादृष्टीने खालील उपाययोजना राबविण्यात येत असतात. त्यात प्रामुख्याने अतिसार असलेल्या सर्व मुलांकरीता ORS आणि झिंकचे वाटप होईल व त्यांच्या मार्फत ते पोहोचल हे सुनिश्चित केले जाते. पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे, काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेशन केले जाते. त्यातही अति जोखमीचे क्षेत्र (झोपडपट्टया, वीटभट्टी व पूरग्रस्त भाग) आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाते.
उपाययोजनाः-
१. पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये ओआरएस व झिंक चा वापर तसेच उपलब्धता वाढवणे.
२. अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे.
३. अतिसाराच्या प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरीता त्याविषयी प्रचार, प्रसार व संवाद या बाबीवर भर देणे.
४. शहरी झोपडपट्टया, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, वीटभट्टी कामगार, स्थलांतरीत मजूर आणि बेघर मुले इ. यांसारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे.
५. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महिला व बाल विकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नगर विकास विभाग व शिक्षण विभाग या विभांगासोबत व इतर भागीदारांसोबत समन्वय साधणे.
या उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणु समिती स्थापन करण्यात आली आहे. ती याप्रमाणे-
१ . जिल्हाधिकारी अध्यक्ष
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष
३. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्राम विकास विभाग, जिल्हा परिषद सदस्य
४. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नगर विकास विभाग, जिल्हा परिषद सदस्य
५. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य
६. जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय सदस्य
७. वैद्यकीय महाविद्यालय, विभाग प्रममुख, बालरोग सदस्य
८. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जि.प. सदस्य
९. जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सदस्य
१०.कार्यकारी अभियंता (Water & san/ Village Panchyat) सदस्य
११. स्थानिक आयएमए प्रतिनिधी सदस्य
१२. स्थानिक आयएमए प्रतिनिधी सदस्य
१३. स्थानिक निमा (Nima) प्रतिनिधी सदस्य
१४. स्थानिक खासगी वैद्यकीय व्यावसायिक (General Practitoner) सदस्य
१५. जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य
१६. जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सदस्य
याच प्रमाणे- महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
उपाययोजना व अंमलबजावणी- ओआरएस व झिंक साठ्याचे वाटप
सर्वस्तरावर ओ.आर.एस. व झिंक गोळ्यांचा औषधी साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री करावी. ज्या ठिकाणी ओआरएस व झिंक गोळ्या उपलब्ध नसतील त्या ठिकाणी त्वरीत व वेळेत साठा उपलब्ध करुन देण्यात यावा. ओआरएस व झिंक साठ्याचे वाटप हे खालीलप्रमाणे यावे.
ओआरएस व झिंक गोळीच्या वाटपासाठी सुचना- ५ वर्षाखालील एकूण बालकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या १०% असते. प्रत्येक आशा स्वयंसेविकांच्या कार्यक्षेत्राची लोकसंख्या १००० ते १५०० असून त्यामध्ये २०० ते ३०० घरे असतात. यानुसार ‘आशा’च्या कार्यक्षेत्रात ५वर्षाखालील बालकांची संख्या १३० ते १५० असते.
अ
तिसार असलेले बालक आढळल्यास प्रति बालक २ ओआरएस पाकीटे व १४ झिंकच्या गोळ्या आवश्यक असतात. त्यानुसार १० (अतिसार लागण झालेल्या) बालकांसाठी २० ओआरएस पाकीटे व १४० झिंकच्या गोळ्या असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये तसेच अंगणवाडीच्या ठिकाणी ओआरटी कॉर्नरची स्थापना करावी. ओआरएस व झिंक च्या वापराविषयी जनजागृती करावी. तसेच समुपदेशन करावे. ग्रामीण, शहरी,मनपा भागातील सर्व आरोग्य संस्थामध्ये बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) व आंतररुग्ण (आयपीडी) विभागात ओआरएस आणि झिंक कॉर्नर स्थापन करुन कार्यान्वित करावेत. ओआरएसची पाकिटे व झिंकच्या गोळ्या उपलब्ध ठेवाव्यात. तसेच ओआरएसचे द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी आवश्यक उपकरणे उदा. स्वच्छ पातेले,वाटी चमचा,वगराळे असावेत.
शाळामध्ये हात धुण्याचे प्रात्याक्षिक : सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांसोबत अंगणवाडी केंद्रामध्येही हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात यावे. हात धुण्याच्या टप्यांविषयी पोस्टर्स प्रत्येक आरोग्य संस्था व शाळांमध्ये व अंगणवाडी केंद्रामध्येही हात धुण्याच्या ठिकाणी लावण्यात यावेत. दररोज प्रार्थनेच्या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्वाविषयी माहिती देण्यात यावी. मध्यान्ह भोजनाच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना साबण व पाण्याने हात धुण्याविषयी शिकवावे. शाळेतील विद्यार्थ्यांकडून हात धुण्याचे महत्व पटविण्यासाठी पंधरवाड्यादरम्यान प्रभातफेरी काढण्यात यावी.
अतिसाराची लक्षणे (जल शुष्कता)-१. अस्थवस्थपणा, चिडचिडेपणा,२. डोळे खोल जाणे, ३.घटाघटा पाणी पिणे (तहानलेला) ,४. त्वचेला चिमटा घेतला असता त्वचा हळूहळू पूर्ववत होणे.
सौम्य जलशुष्कता लक्षणे- १. सुस्तावलेला किंवा बेशुद्ध पडणे. २. डोळे खोल जाणे, पिऊ किंवा स्तनपान करु शकत नाही किंवा असमाधानकारकरित्या पित आहे. ३. त्वचेला चिमटा घेतला असता त्वचा हळूहळू पूर्ववत होणे.
गंभीर जलशुष्कता असल्यास-वैद्यकीय अधिकारी, सीएचओ द्वारे आरोग्यवर्धिनी केंद्र व प्रा. आ. केंद्रस्तरावर तसेच स्टाफ नर्स द्वारे आरोग्य संस्थेत उपचार करावे.
अतिसार व्यवस्थापन व उपचार- अतिसार झाल्याबरोबर (एका दिवसामध्ये ३ पेक्षा जास्त वेळा जुलाब होणे) लगेच ओआरएसचे द्रावण आणि इतर द्रव पदार्थ द्या आणि अतिसार थांबेपर्यंत देत राहा. बालकाला १४ दिवसांपर्यत झिंक गोळी द्या. अतिसार होणे थांबले तरी गोळी देत रहावे.अतिसारामध्ये ओआरएस व झिंक देणे हे अतिसरावरील उपचाराची योग्य पद्धती असून अतिसार लवकर बरा होण्यास फायदेशीर आहे. बाळाची विष्ठेची लवकर आणि सुरक्षित प्रकारे विल्हेवाट करावी. अतिसारा दरम्यान जे बाळ स्तनपान घेत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवा आणि अतिसारा दरम्यान व नंतरही जास्तीत जास्त स्तनपान द्या. स्वच्छ हातांनी स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्या. स्वंयपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरण्यापूर्वी तसेच बालकाची शी स्वच्छ केल्यानंतर आणि बालकाला साफ केल्यानंतर मातेने हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. खालील पैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास बालकाला आरोग्य कर्मचाऱ्याकडे किंवा संस्थमध्ये घेऊन जावे.
· बालक अधिक आजारी होत असेल.
· अस्वथपणा, चिडचिडेपणा
· घटाघटा पाणी पिणे
· स्तनपान करुन शकत नसेल.
· शौचामध्ये रक्त पडत असल्यास.
· कमी पाणी पित असल्यास.
· ताप येत असल्यास.
· अतिसाराबाबतच्या सल्ल्यासाठी आशा किंवा एएनएमशी संपर्क साधावा.