State Board : इयत्ता दहावीचा निकाल 95 81 टक्के

0

पुणे(Pune), 27 मे  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला असून यंदा या नियमित परीक्षेत 95 पूर्णांक 81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाही कोकण विभागाची उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वाधिक असून यात 99 पूर्णांक 1 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा असून त्याची टक्केवारी 94 पूर्णांक 73 टक्के इतकी आहे. पुणे विभागाचा निकाल 96 पूर्णांक 44 टक्के लागला असून मुंबई विभागाचा निकाल 95 पूर्णांक 83 टक्के इतका आहे.

दहावीच्या नियमित परीक्षेसाठी यंदा राज्यातील 9 विभागीय मंडळातून 15 लाख 49 हजार 326 नियमित विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 14 लाख 84 हजार 441 जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1 पूर्णांक 98 टक्क्यांनी निकाल वाढला आहे. यावर्षीही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 97 पूर्णांक 21 टक्के इतकी आहे. तर 94 पूर्णांक 56 टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के आहे, तर 187 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100 टक्के गुण मिळाले आहेत.