आपली बस चालकांच्या “डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग” प्रशिक्षण वर्गाला सुरुवात

0
आपली बस चालकांच्या डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग प्रशिक्षण वर्गाला सुरुवात
Start your defensive driving training class for bus drivers

–   आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर ता २९:नागपूर महानगरपालिका परिवहन विभाग आणि जनआक्रोश यांच्या संयुक्त विद्यमाने आपली बस चालकांसाठी आयोजित “डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग” याविषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन गुरुवारी (ता:२९) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

धरमपेठ येथील ट्राफिक चिल्ड्रनस पार्क येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, जनआक्रोश संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्दड, सचिव रवींद्र कासखेडीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, मनपाचे आपली बस चालक हे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. आपली बस चालक हे दररोज स्वतः हजारो प्रवास्यांना घेऊन ये-जा करतात, त्यामुळे त्यांची जबाबदारी देखील अधिक वाढते. रत्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी नियमांचे ज्ञान आणि नियमांचे पालन करणे याबाबी अत्यंत महत्वाच्या ठरतात. ज्याप्रकारे वाहन आधुनिक होत चालले आहेत तसेच नियम देखील बदलत चालले आहेत. त्यामुळे दोन्ही बाबींचे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. तसेच जनआक्रोश संस्थेच्या सहकार्याने ट्राफिक पार्क येथे पुढे चालून शाळेल विद्यार्थ्यांना देखील वाहतून नियमांचे प्रशिक्षण देण्याचा मनपाचा मानस असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले. जनआक्रोश संस्थेद्वारा सेवाभावी वृत्तीने राबविण्यात येणाऱ्या विविध स्तुत्य उपक्रमांचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी अभिनंदन केले.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक  श्रावण हर्डीकर यांनी प्रशिक्षणाचे महत्व विशद करिता प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया, आपले कार्य अधिका चांगल्याप्रकारे करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असल्याचे  हर्डीकर यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले की, आपली बस चालक हे प्रशासनाचा एक भाग आहे. जेव्हा ते चालकाच्या जागेवर बसतात तेव्हा ते प्रशासनाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांच्या कार्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते, त्यांची जबाबदारी ही अनेक पटीने वाढते. अत्याधुनिक युगाकडे वाटचाल करीत असतांना भविष्यात वाहनाचे स्वरूप देखील बदलणार आहेत, स्वयंचलित वाहने देखील भविष्यात पाहायला मिळतील अशात नवनवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासठी प्रशिक्षण महत्वाचे ठरते, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वाहतूक शहराचा कणा असल्याचेही  हर्डीकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत जनआक्रोश संस्थेचे रवींद्र कासखेडीकर यांनी या  दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात मनपाच्या एक हजाराहून अधिक आपली बस चालकांना “डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग” याविषयावर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद रहाटगावकर यांनी केले तर जनआक्रोश संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्दड यांनी आभार व्यक्त केले.

पहिल्या दिवसाच्या प्रशिक्षण वर्गात अनिल जोशी,  सुबोध देशपांडे,  ज्ञानेश पाहुणे यांनी बस चालकांना प्रशिक्षण दिले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री. वझलवार, नाना देवईकर, संजय डबली, अशोक करंदीकर, आरती पाहुणे,  संगीता मेलग यांनी सहकार्य केले.

 आपली बस चालकांची  नि:शुल्क नेत्र तपासणी

मार्गदर्शन करीत माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी, अपघात टाळण्यासाठी वाहनचालकाची भूमिका महत्वाची आहे. वाहन चालकांनी आपल्या डोळ्याची काळजी घ्यायला हवी, त्याकरिता महात्मे नेत्र रुग्णालयामध्ये आपली बस चालकांसाठी नि:शुल्क नेत्र तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले. पुढे असे सांगितले की २९ टक्के चालकांच्या डोळयांमध्ये दोष आहे. त्यांना वाहन चालवितांना  बरोबर दिसत नाही.या साठी सर्व वाहन चालकांचे डोळे तपासणे अंत्यत गरजेचे आहे. त्यांनी आपल्या संस्थे कडून महापालिकेच्या सर्व बस चालकांच्या डोळयांची नि:शुल्क तपासणी करण्याचे आश्वासन दिले, मनपा आयुक्तांनी यासाठी त्यांचे आभार मानले.