
आमदार डॉ. आशिष देशमुख यांची मेट्रो प्रकल्प महाव्यवस्थपाकांकडे ठाम मागणी
नागपूर(Nagpur) : नागपूरच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात सीताबर्डी ते कोराडी या ११.५ किमी मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर आता हा मार्ग खापरखेडा पर्यंत वाढवावा, अशी आग्रही मागणी सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मेट्रो प्रकल्पाचे महाव्यवस्थापक श्रवण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी झालेल्या भेटीत डॉ. देशमुख यांनी हर्डीकर यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, खापरखेडा शहर औद्योगिक केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. येथे दोन मोठी औष्णिक वीज केंद्रे, कोळसा खाणी तसेच अनेक लघु-मध्यम उद्योगधंदे कार्यरत आहेत. त्यामुळे येथील लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण झपाट्याने वाढत आहे.
खापरखेडा हा छिंदवाडा-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी येथे सतत सुरू असते, आणि त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मेट्रोचा विस्तार खापरखेडा पर्यंत करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. देशमुख यांनी नमूद केले.
मेट्रो सेवा सुरू झाल्यास खापरखेडा आणि नागपूर शहर थेट जोडले जाईल, प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच प्रदूषणातही घट होऊन परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल, असे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मेट्रो प्रकल्पाचे महाव्यवस्थापक श्रवण हर्डीकर यांनी खापरखेडा विस्ताराबाबत सकारात्मक दृष्टीकोन दर्शवला, तसेच औद्योगिक महत्त्व आणि भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.