

(Mumbai)मुंबई : प्रलंबित मागण्यांच्या मुद्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा बेमुदत संपाची हाक दिली आहे. (ST Employees Strike call) पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने 11 सप्टेंबरला संपाचा इशारा दिला असून कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. सरकारने मागण्या मान्य न केल्यास 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसतील, असा इशारा देण्यात आला आहे.
करारातील तरतुदीनुसार सरकारने ४२ टक्के महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत देण्यात यावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. १९ सप्टेंबरला सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संघटनांनी संपाचा इशारा दिलाय. दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा. एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी, तसेच वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसगाड्यांचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा, लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी 240 हजर दिवसांची अट रद्द करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा, जुलमी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी, अशाही मागण्या संघटनेने केल्या आहेत.
गेल्यावर्षीही एसटी कर्मचाऱयांच्या संपानंतर सरकारने मोठ्या शिताफीने संप मिटविण्यासाठी काही मागण्या मान्य केल्या होत्या व आश्वासने दिली होती. मात्र, अजूनही काही मागण्या आणि पगार रखडल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.