

– धर्मभास्कर प. पू. श्री सद्गुरुदास महाराज
गुरुभक्तीत प्रारब्ध बदलण्याचे सामर्थ्य आहे, असे २० व २१ व्या अध्यायात आलेल्या “प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी, तरी का भजावे श्रीहरी।” या प्रश्नाला श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी आपल्या अद्भुत क्रियेतून मृत पुत्र जिवंत करून दिले, असे श्रीगुरुचरित्रातील गुरुभक्तीचे विभिन्न पदर विषद करताना सद्गुरुदास महाराज म्हणाले. गुरुभक्ती म्हणजे बुवाबाजी किंवा अंधश्रद्धा नाही, अपवादात्मक परिस्थितीत काही महान कार्यासाठी असे प्रसंग घडतात, असे ते म्हणाले.
पुणे (Pune) येथे पत्रभेट प्रकाशन व श्रीगुरूमंदिर परिवार आयोजित या प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. सद्गुरुदास महाराजांचे स्वागत सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट चे गुरुवर्य श्री. प्रकाशभाऊ शिंदे यांनी केले. गरवारे महाविद्यालयात आयोजित या प्रवचनाला पुणेकर गुरुभक्तांनी तुडुंब प्रतिसाद दिला.
सुरुवातीला महाराजांनी ‘मी आपले दर्शन घ्यायला आलो आहे’, असा उल्लेख केला. त्याचा उलगडा समारोपाच्या वेळी त्यांनी माऊलींच्या ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेचि झाले देहब्रम्ह’ हा अनुभव देणारे प्रसंग सांगितले, तेव्हा झाला. संपूर्ण सभागृह एकरूप, एकात्म होऊन हे श्रवण करीत होते. पाणावलेल्या नेत्रांनी आणि भारलेल्या मनांनी महाप्रसाद सेवन करून सगळ्यांनी प्रसन्नतेचा अनुभव घेतला.
अमेरिकेतील मंगेश फडके, गजानन भक्त चिरंजीव सुरभी ढगे, गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे, रुपाली गावस्कर, विश्वकर्मा प्रकाशनचे शिवभक्त संदीप तापकीर असे अनेक मान्यवर, पत्रभेटचे संपादक, छत्रपती सेवा प्रतिष्ठान चे शिवभक्त, विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राचे उपासक व असंख्य गुरुभक्तांची उपस्थिती लाभलेला हा सत्संग अविस्मरणीय सोहळा ठरला. नाशिकच्या मोहन बरबडेंनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन शशांक देशपांडे यांनी केले.