

डोळखांब (ठाणे) Thane : नवीन वर्षाच्या प्रारंभाला श्री वाल्मिकी ऋषी समाधी दर्शन आणि पाळणा दर्शनाने शुभारंभ करून शंभुदुर्ग संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी आजोबा पर्वत (आजा डोंगर) येथे श्रावण स्वच्छता अभियान, धर्मरक्षण, आणि गड-किल्ला संवर्धन विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले. या मोहिमेत ठाणे आणि मुंबई परिसरातील शेकडो तरुणांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने झाली. शंभुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष श्री आदेश चौधरी, सचिव श्री संजय चौधरी, आणि प्रसिद्धी प्रमुख श्री संजय लोंढे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. खजिनदार श्री विलास जाधव, कार्यकर्ते श्री सागर मोरे, खडवली विशाल नीचीते, गणेश मते, रुपेश भोईर, आणि कु. स्वरा संजय लोंढे यांनी मोहिमेचे व्यवस्थापन उत्कृष्टरीत्या केले.
गडाची स्वच्छता करून तेथील ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी तरुणांनी गड संवर्धनाची गरज आणि धर्मरक्षणाची महत्त्व पटवून दिले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उत्साहाने हा उपक्रम यशस्वी झाला.
या मोहिमेद्वारे शंभुदुर्ग संघटनेने गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती केली असून, यापुढेही असे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.