


‘भारताची भारतीय अवधारणा’ वर विदर्भ साहित्य संघात व्याख्यान
नागपूर (Nagpur), 28 सप्टेंबर
वसुधैवकुटुंबकम, सर्वसमावेशकता, विश्वकल्याण या जीवनदृष्टीमुळे भारत एकमेवाद्वितीय ठरतो. भारताच्या या जीवनदृष्टीचा आधार आध्यात्मिक आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.
सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारताची भारतीय अवधारणा’ या विषयावर डॉ. मनमोहन वैद्य यांचे शनिवारी व्याख्यान पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते तर मंचावर ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक डॉ. मनमोहन वैद्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, सी.पी. अँड बेरार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोक बनसोड, सचिव विजयराव कागभट, सी.पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद जोशी आणि विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांची उपस्थिती होती.
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जर्मनी, जपान, इंग्लड, इस्त्रालय या देशांचे मोठे नुकसान झाले. त्यांना उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर त्याच्यापुढे इतका संघर्ष नव्हता. 75 वर्षाचा इतिहास बघता आपला देश या केवळ आपली ओळख विसरल्यामुळे या देशांसारखी प्रगती करू शकला नाही. आपल्याला शिक्षण, संरक्षण, आध्यात्मिक, अर्थनीती ठरवता आली नाही आणि विकास खुंटला.
कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, राजयोग मानणा-या भारतामध्ये प्रत्येकाला आपला धर्म (समाजाला परत करण्याची दृष्टी), उपासना निवडण्याचे स्वातंत्र्य असून भारताची ओळख हिंदुत्वाची आहे. ही ओळख कायम ठेवली तर देश वेगाने प्रगती करेल, असे ते म्हणाले.
पाश्चात्य देशांनी ज्ञान प्रसृत केले. त्यामुळे समाजात निर्माण होणा-या समस्याचे निवारण करण्याचे उत्तरदायित्व त्यांचे होते. पण जेव्हा आपल्या समाजाचा विचार करून जेव्हा आपण धोरण आखले तेव्हा जगाने मार्गदर्शक म्हणून स्वीकारले, असे सांगताना डॉ. प्रशांत बोकारे यांनी भारतीयत्वाची अवधारणा सर्व क्षेत्रात आणावी लागेल, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. अरविंद जोशी म्हणाले, साहित्य व प्रबोधन क्षेत्रात विदर्भ साहित्य संघाचे जसे योगदान राहिले व नावलौकिक मिळवला तसाच सी.पी. अॅड बेरारचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान व लौकिक राहिला आहे. या दोन्ही संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करीत आहेत.
अध्यक्षीय भाषणात प्रदीप दाते यांनी नव्या पिढीला अनेक गोष्टी माहिती नाही. त्याच्यापर्यंत भारताचे वैभव पोहोचवणे हे आपली जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने डॉ. मनमोहन वैद्य यांचे व्याख्यान मार्गदर्शक ठरेल, असे उद्गार काढले.
प्रास्ताविक व परिचय प्रा. डॉ. विभा क्षीरसागर यांनी केले. आनंद किटकरू यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक अलोणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती लोडे यांनी केले.