फुटाळा फाऊंटेनच्या कामाला गती द्या.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश

0

नागपूर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फुटाळा तलावातील फाऊंटेनच्या व बांधकाम प्रकल्पाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज, शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबरला प्रशासनाला दिले.

ना. श्री. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, फाउंटेनच्या कलादिग्दर्शक अभिनेत्री रेवती, महामेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी यांची उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी यांनी आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून फाउंटेनच्या कामाला तात्काळ पुन्हा सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. काम पुन्हा सुरू करताना नव्याने येणाऱ्या खर्चाचा अंदाज घ्या. काही बाबतीत दुरुस्ती करायची असेल तर तेदेखील तपासून घ्या, अश्याही सूचना ना. श्री. गडकरी यांनी दिल्या. फाउंटेनच्या खराब झालेल्या केबल्सचा पुनर्वापर इतर कुठल्या कामांमध्ये करता येईल का, हे तपासण्याच्या सूचनाही ना. श्री. गडकरी यांनी दिल्या. प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश ना. श्री. गडकरी यांनी दिले.