


नागपूर (Nagpur) : 13 जानेवारी
वयस्क साहित्यिकांनी बालसाहित्य लेखन करणे ही अतिशय अवघड बाब आहे, आधुनिक काळात ते आणखी कठिण आहे, त्यासाठी विद्यमान काळात स्मार्ट बालकांची मानसिकता लक्षात घेऊन बालसाहित्याची निर्मिती व्हावी असा सूर ‘बालभारती आणि मराठी मनाचे नाते’ या विषयावर आयोजित परिसंवादात सहभागी मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त झाला.
नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन स्थानिक सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात बालभारती विषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रसिद्ध लेखक प्रकाश एदलाबादकर, ज्येष्ठ साहित्यिक मधुकर धर्मपुरीकर, अध्यापक मोहन शिरसाठ, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त एकनाथ आव्हाड, संमेलनाचे संयोजन अध्यक्ष रवींद्र काटोलकर, संमेलनाचे संयोजक रमेश बक्षी, डॉ. वंदना बडवाईक, संध्या महाजन आदी मान्यवर उपस्थित होतेे.
याप्रसंगी बोलताना एकनाथ आव्हाड यांनी, माझा उल्लेख करताना 30 वर्षे सातत्याने बालसाहित्य लेखन करणारा असा होतो, पण विद्यार्थ्यांमुळेच मी हे लेखन करु शकलो आणि त्याचे योगदान देखील बालभारतीत देऊ शकलो. बालकांची मानसिकता ओळखून लिखाण केल्यामुळेच मी 30 वर्षे कार्यरत राहिलो असे सांगितले. यावेळी प्रकाश एदलाबादकर यांनी, मी गणित शिक्षक असून माझ्या आईमुळे लेखनाच्या क्षेत्रात आलो, विशेष म्हणजे गणितामुळेच माझे साहित्य फुलले आणि उपयोजित झाले असे सांगितले. पाठ्यपुस्तक निर्मितीबाबत बोलताना मोहन शिरसाठ यांनी, बालभारती विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी साहित्य निर्मिती करते पण प्रकाशनासाठी अंतिम निवड करताना इयत्ता, त्या वयोगटातील विद्यार्थ्यांची मानसिकता, त्याचे मूल्य समजण्याची पात्रता आदींचा विचार करावा लागतो असे सांगितले.
बालभारतीतील सचित्र साहित्य व व्यंगचित्रे या विषयावर बोलताना मधुकर धर्मपुरीकर यांनी, याच पुस्तकांमधील अनेक चित्रांचा हवाला देत, मोठ्या माणसांना समजत नाहीत, अशा चित्रांचे वर्णन मुले लिलया करतात, त्यामुळे पुस्तकांमधील हास्यचित्रे, दृकश्राव्य मालिका, व्यंगचित्रे अधिक लोकप्रिय ठरत आहेत. याच चित्रांचे वर्णन करताना मुली स्त्रीसुलभ मानसिकतेच्या रेषा ओलांडून सौंदर्यदृष्टीशी नाते सांगताना दिसतात असे निरीक्षण देखील नोंदविले. यासोबतच बालसाहित्य सुलभ, सुगम, तरल, मनोरंजक, आनंददायी असावे पण त्यात उपदेशाला स्थान न ठेवता, असे सांगितले. ज्ञानभाषा ही शैक्षणिक ज्ञानभाषा व्हावी आणि मुख्य म्हणजे त्यात बोलीभाषेचा अंतर्भाव झाल्यास व उच्चशिक्षण मराठीतून झाल्यास बालसाहित्याचे भावविश्व अधिक समृद्ध होईल असा विश्वास परिसंवादात सहभागी मान्यवरांनी आपल्या विवेचनातून व्यक्त केला.
पहिल्या सत्राचे संचालन प्रतिभा लोखंडे व डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.