

‘माय अनटोल्ड स्टोरी’ या स्वकथन ग्रंथाचे थाटात प्रकाशन
नागपूर (Nagpur), 16 मार्च
प्रत्येक आत्मचरित्र स्वकथन असते, हे जरी खरे असले तरी डॉ. इश्वर नंदपुरे यांचे स्वकथन म्हणजे मांडणीचा नवा आकृतीबंध आहे. यात अनुभवांचे सरळरेषीय लिखाण टाळल्याने वाचनियता प्राप्त झाली आहे. त्यांच्या या ग्रंथाचा समग्र आत्मचरित्रात समावेश व्हावा, असे उद्गार विदर्भ संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी यांनी येथे काढले.
विदर्भ साहित्य संघ आणि लाखे प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध साहित्यिक डॉ. ईश्वर नंदपुरे यांच्या ‘माय अनटोल्ड स्टोरी’ या स्वकथन ग्रंथाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते तर भाष्यकार म्हणून सुप्रसिध्द समीक्षक डॉ. वि.स. जोग, विदर्भ साहित्य संघ, भंडारा शाखेचे अध्यक्ष प्रमोदकुमार अणेराव आणि विशेष अतिथी म्हणून लाखे प्रकाशनाचे चंद्रकांत लाखे उपस्थित होते.
डॉ. नंदपुरे यांच्या या पुस्तकात भयानक सामाजिक वास्तव, समाजरचनेची माहिती व चटका लावणारे वर्णन असले तरी लिखाण दुषित, विद्रोही व टिकेचा स्वर लावणारे नाही. परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळते, असे डॉ. मदन कुळकर्णी म्हणाले. नंदपुरे हे प्रकाशकाला समजून घेणारे लेखक असल्याचे सांगत चंद्रकांत लाखे यांनी त्यांना सुयश चिंतिले. नंदपुरे हे वैचारिक वारसा असलेल्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. स्वत:चा संघर्षमय भूतकाळ खोदून, दीर्घ पल्ल्याचे, चित्रमय लेखन करण्याचे कठीण कार्य त्यांनी केले आहे. हे कथन प्रामाणिक व वस्तुनिष्ठ असल्याचे उद्गार प्रमोदकुमार अणेराव यांनी काढले.
डॉ. नंदपुरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या पुस्तकातील पात्र माझ्यासमोर बसली असून ही त्यांची ‘अनटोल्ड स्टोरी’ आहे. माझे पुस्तक चरित्राचे अनुकरण नसून कथन आहे. हे कथन शेवटच्या श्वासापर्यंत सुरु राहील.
प्रदीप दाते यांच्या साक्षेपी अध्यक्षीय भाषणाने समारंभाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय राठोड यांनी केले. आभार डॉ. शशांक अणेराव यांनी मानले. स्वागत अण्णाजी बेंद्रे, डॉ. राजकुमार खापेकर आणि मोहन मिरासे यांनी केले. प्रारंभी रजनी नंदपुरे आणि नंदपुरे यांच्या कन्या आरती चौधरी आणि भारती राव यांचा सत्कार करण्यात आला. बालमित्र नरेंद्र भुरे, व्यंकटेश शब्दे यांचे शुभेच्छापर भाषण झाले.
अहंकाराच्या जखमांपासून अलिप्तता: डॉ. वि. स. जोग
डॉ. नंदपुरे यांचे पुस्तक जातीय अहंकाराच्या जखमांच्या टोकदार भाषेपासून अलिप्त आहे. यात प्रतिशोधाचा व अभद्रतेचा शब्द नसून सामाजिक समरसता आहे. वेदना संघर्षाची पवित्र, स्वच्छ, सुंदर शैली यात उध्दृत आहे, असे उद्गार डॉ. वि. स. जोग यांनी काढले.