विदर्भातील उद्योगांना चालना देण्‍यासाठी विशेष कृती दल

0

 

नागपूर (Nagpur )– कॅरेट कॅपिटल आणि असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्हलपमेंट (एआयडी) च्‍या पदाधिका-यांची नुकतीच बैठक पार पडली. त्‍यात विदर्भातील मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी समर्पित विशेष कृती दलाची स्थापना करण्‍यासंदर्भात निर्णय घेतण्‍यात आला.

या बैठकीला कॅरेट कॅपिटलचे भागीदार प्राजक्त राऊत, पंकज बन्सल तसेच, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ. विजयकुमार शर्मा, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री व प्रणव शर्मा, बेबी व्हर्सचे संस्थापक शशिकांत चौधरी, राजेश रोकडे, पंकज भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नुकत्‍याच पार पडलेल्‍या ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’मध्‍ये असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्हलपमेंट (एआयडी)ने कॅरेट कॅपिटलसोबत धोरणात्मक आघाडी करून सामंजस्य करारावर स्‍वाक्षरी करण्‍यात आली हेाती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित करण्‍यात आलेल्‍या या अॅडव्‍हांटेज विदर्भमध्‍ये गुंतवणुकीला चालना देणे, परिवर्तनशील विकासास चालना देणे आहे तसेच, विदर्भाला समृद्धीकडे नेण्यासाठी उद्योजकता आणि नाविन्यपूर्णतेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला होता.

ही कृती समिती स्केलेबिलिटी वाढविणे, तंत्रज्ञान-सक्षम कार्यक्षमतेचा वापर करणे, ब्रँड इक्विटी वाढविणे आणि क्षेत्रांतर्गत प्रतिभा जोपासण्यासाठी सज्ज असून निवडक कंपन्‍यांच्‍या विकासासाठी काम करणार आहे. त्‍याकरीता एक कार्यक्रम आखण्‍यात आला असून त्‍यात आयआयएम नागपूरसारख्या मान्यवर शिक्षणसंस्था, देशभरातील उद्योग क्षेत्रातील नेते आणि डायनॅमिक स्टार्टअप्सचा सहभाग असणार आहे.