

मी आज ओळख करून देणार आहे ,एका अशा सखीची जी रूपवान तर आहेच, पण मनानेही अतिशय सुस्वभावी असून तेव्हडीच लढाऊ , धाडसी , करारी वृत्तीची आहे .तिने लढाई लढली कुणा शत्रूशी नाही तर कॅन्सर सारख्या असाध्य रोगाशी ! दचकलात ना?
हो, कॅन्सर हा शब्दच दचकायला लावणारा आहे. परंतु आपल्या कणखर ,जिगरबाज वृत्तीने तिने ह्या असाध्य रोगावर मात केली व फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा नव्याने आपले जीवन सुरू केले.
ओळखलंत का ? अगदी बरोबर! हो ,मी न्यूज स्टोरी टूडे या आंतरराष्ट्रीय पोर्टल च्या निर्मात्या, न्यूज स्टोरी टूडे पब्लिकेशन च्या प्रकाशिका सन्माननीय सौ अलका देवेंद्र भुजबळ यांच्या बद्दलच सांगते आहे. आज हे पोर्टल ८६ देशात पोचले असून ५ लाखाच्या वर त्याचे वाचक आहेत.तर
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने वर्ष भरातच ८ दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत.
एक स्त्री आपल्या मनशक्तीच्या जोरावर काय करू शकते ? याचे उदाहरण म्हणून मला अलकाताईबद्दल लिहितांना विशेष अभिमान व आनंद वाटत आहे. अलकाताईंना ६ वर्षांपूर्वी कॅन्सर चे निदान झाले होते. या कॅन्सर ला न भिता त्यांनी धीराने तोंड दिले. त्या अनुभवावर आधारीत त्यांनी “कॉमा” हे पुस्तक लिहिले. त्याच नावाने निर्माण झालेल्या माहितीपटाचे प्रकाशन राजभवन येथे तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते झाले. पुढे त्यांनी अनेक ठिकाणी “कॉमा संवाद उपक्रम” राबविले. रेडिओ,टिव्ही वर मुलाखती दिल्या. कोरोना काळात ऑनलाईन मार्गदर्शन केले. कॅन्सर ग्रस्त व्यक्ती व कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी त्या सतत सक्रिय असतात.
सौ अलकाताईंना त्यांचे पती देवेंद्र व पत्रकार कन्या देवश्री यांची सतत सकारात्मक साथ , मार्गदर्शन मिळत गेले आहे.देवेंद्र भुजबळ हे माहिती संचालक पदावरील ज्येष्ठ श्रेणीचे अधिकारी होते. ते सध्या न्यूज स्टोरी पोर्टल चे संपादक म्हणून कार्यरत आहेत.तर देवश्री ने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात मास्टर ऑफ जर्नालिझम चा कोर्स केला असून ती सध्या मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रात चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे.
अशा या अलकाताईंचा जाणून घेऊ या, प्रेरणादायी जीवन प्रवास….
अलकाताईंचा जन्म मुंबई येथे मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण व्यवस्थित पार पडले. पुढेही त्यांना शिकायचे होते. परंतु घरातील आर्थिक स्थिती बेताचीच ! अशातच टेलिफोन खात्याची जाहिरात त्यांच्या पाहण्यात आली. अर्ज केला. मुलाखत झाली व निवड देखील झाली. त्यावेळी घरातील जबाबदारी,शिक्षण व नोकरी अशी तिहेरी भूमिका त्यांनी चोख निभावली.
अलकाताई सुंदर असल्याने खूप स्थळ सांगून येत.मात्र जोडीदाराविषयी त्यांची एकमात्र इच्छा होती की तो श्रीमंत नसला तरी आपल्या पेक्षा जास्त
शिकलेला असावा! ईश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि श्री देवेंद्र भुजबळ ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला . लक्ष्मी नारायणाची ही जोडी अगदी दृष्ट् लागण्यासारखी ! त्यावेळी देवेंद्र भारत सरकारच्या मुंबई दुरदर्शन केंद्रात सहायक निर्माते होते.
विवाहानंतर अलकाताईं अभिनय, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन, विविध शिबीर असे अनेक उपक्रम आपल्या पतीच्या सहकार्यामुळे करत राहिल्या. सासूबाईंची देखील भक्कम साथ लाभली होती.सर्वांना त्यांचा खूप अभिमान होता.
आनंदात भर म्हणून मनासारखे सुरू असतांना त्यांच्या संसारवेलीवर एक गोड फुल आले व देवश्रीचा जन्म झाला.घर आनंदाने फुलून गेले. घरातील जबाबदारी,त्यांची नोकरी चालूच होती. घरातील सर्वांचे प्रोत्साहन होतेच!
अलकाताई आरोग्याविषयी आधीपासूनच जागरूक होत्या.आपल्या सोसायटीत त्यांचे महिलामंडळ होते .विविध कार्यक्रम होत असत. एकदा महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी जे जे रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ तथा विभाग प्रमुख
डॉ रेखा डावर यांना “महिलांचे आरोग्य ” या विषयावर बोलण्यासाठी बोलावले होते तेंव्हा त्यांना काय माहित की ही ओळख पुढे त्यांच्या कामात येणार आहे ?
झाले असे की अचानक त्यांच्या ओटीपोटात दुखायला लागले , प्राथमिक इलाज करूनही दुखणे असह्य झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी केली त्यात दोन ओव्हरीच्या मध्ये गाठ दिसल्याने डॉक्टरांनी त्यांना सिटी स्कॅन करण्याचा व स्त्री रोग तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला आणि पूर्वी ओळख झालेल्या डॉ डावर मॅडमची त्यांना आठवण झाली . आवश्यक त्या सगळ्या टेस्ट होऊन कॅन्सरचे निदान झाले व ताबडतोब त्यावर यशस्वी शत्रस्क्रिया झाली. दुर्धर समजल्या जाणाऱ्या या जीवघेण्या आजारावर त्यांनी यशस्वी मात केली. ते केवळ स्वतःची इच्छाशक्ती , योग्य डॉक्टरांकडून योग्य उपचार , आणि महत्वाचे म्हणजे पतीची आणि मुलीची मोलाची साथ !
मुळातच लढाऊ व धाडसी वृत्ती असल्याने त्या ह्यातुन सुखरूप बाहेर पडल्या. या स्वानुभवावर त्यांनी लिहिलेले ‘ कॉमा ‘हे पुस्तक प्रसिद्ध डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकावर आधारित ‘ कॉमा ‘ हा माहितीपट महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवनात प्रकाशित करण्यात आला. राज्यपाल हा माहितीपट पाहून खूपच प्रभावित झाले.
त्यांच्या कॉमा संवाद उपक्रमात हा माहितीपट नेहमीच दाखविण्यात येतो.या उपक्रमात अलकाताई स्वानुभव कथन करतात.संबंधित संस्थेने बोलविलेले डॉक्टर मार्गदर्शन करतात.त्या नंतर प्रश्नोत्तराद्वारे उपस्थितांचे शंका समाधान करण्यात येते.
गेल्याच वर्षी त्यांच्या पोर्टलच्या यशाबद्दल ठाणे येथे सावित्रीबाई फुले पुरस्कार व नाशिकला माणुसकी गौरव पुरस्कार मिळाला आहे.
कॉमा हे पुस्तक मी एका बैठकीत वाचले आणि पुन्हा पुन्हा वाचते आहे. एक स्त्रीची ही शौर्यगाथा आहे. त्यांनी कॅन्सर सारख्या महाराक्षसाला कसे परतवून लावले हे वाचतांना माझ्याच भावना अनावर होत होत्या . कॅन्सर विरुद्ध लढा देतांना त्याना ज्या यातना झाल्या असतील,जे मानसिक धैर्य ठेवावें लागले असेल त्याची कल्पनाच केलेली बरी!
पण कॉमा लिहितांना त्यांनी अगदी सहजपणे आपबिती कथन केली आहे.
अनेक पुरस्कारांची मानकरी असलेल्या अलकाताईंना
गेल्याच वर्षी त्यांच्या पोर्टलच्या यशाबद्दल ठाणे येथे सावित्रीबाई फुले पुरस्कार व नाशिकला माणुसकी गौरव पुरस्कार मिळाला आहे.
अलकाताईंनी देशाबरोबरच विदेशातही भरपूर प्रवास केला आहे .अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करून त्यात त्या सहभागीही झाल्या आहेत.बंदिनी,दामिनी, हे बंध रेशमाचे, महाश्वेता, पोलिसातील माणूस, जिज्ञासा या दूरदर्शन मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत . हे सगळे करीत असतांना त्या कधीच थकत नाहीत. अतिशय आनंदी वृत्तीच्या अलकाताईना कशाचाही जरासाही अभिमान नाही .
न्यूज स्टोरी टुडे चा भलामोठा व्याप संभाळूनही त्यांचे दैनंदिन जीवन चारचौघी सारखेच आहे.
आता पोर्टल च्या जोडीने त्यांनी मैत्रिणींच्या आग्रहाखातर प्रकाशन व्यवसायातही झेप घेतली आहे व ८ पुस्तके प्रकाशित केली आहेत .तर काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
त्यांच्याविषयी अधिक जाणुन घेण्यासाठी मो फोन करणार आहे हे कळल्यावर त्यांनीच मला फोन केला आमचे दिलखुलास बोलणे झाले एव्हड्या मोठ्या स्तरावर काम करणाऱ्या अलकाताईशी बोलताना मनावर दडपण होते पण . पाचच मिनिटांत खूप जुनी घट्ट मैत्री असावी असं वाटलं जिवलग मैत्रिणीशी बोलावे असं आमचं बोलणं झालं. प्रत्यक्ष भेट झालेलीनसून त्या मनाने किती निर्मळ आहेत त्यांचे अंतरंग किती सोज्वळ आहे हे अनुभवले .बोलतांना त्यांच्याकडून बरेच शिकायला मिळाले. त्यांची मैत्रीण पूर्णिमा शेंडे नी त्यांच्या गुणांवर केलेली कविता किती सार्थ आहे याचा अनुभव आला भुजबळ पतिपत्नी दोघांचे जीवन पाहिले की म्हणावेसे वाटते रबने बनायी जोडी !हे जीवन सुंदर आहे असे त्यांचे साधे सुंदर विचार! ते भरभरून जगण्याचा त्यांचा स्वभाव मला खूप आवडला आणि सहज जीवनमृत्यू या सिनेमातील आनंद बक्षीचे गाणे आठवले
“झिलमिल सितारोका आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा “…
अशा ह्या अष्टपैलू, उत्साही,हरहुन्नरी, निर्भीड व तितक्याच मनमिळाऊ व प्रेमळ व्यक्तिमत्व लाभलेल्या अलकाताईंचा १८ एप्रिलला वाढदिवस आहे त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा . त्यांच्या विषयी माझ्या भावना व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न त्यांना आणि वाचकांनाही आवडेल अशी आशा आहे .
लेखन:प्रतिभा पिटके
अमरावती
9421828413