‘सोबती’ व ‘कंपॅनियन’ चे थाटात प्रकाशन

0

 

नागपूर (Nagpur):-  आज अनेक रुग्ण विविध गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची परिस्थिती आहे.अश्या स्थितीत रुग्णांप्रति सामाजिक संवेदनशीलता महत्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.असाध्य रोगांनी ग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या सोबती सेवा फाऊंडेशन, पुणे(Pune), यांच्या चंद्रशेखर वेलणकर लिखित ‘सोबती’ या मराठी पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि ‘कंपॅनिअन’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज शनिवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते.

 

 

कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट, आयटी पार्क, गायत्री नगर येथे हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाला रामकृष्ण मठ, नागपूरचे अध्यक्ष स्वामी राघवेन्द्रानन्द, मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. सोबती संस्थेच्या संचालक वर्षा वेलणकर, स्पेसवूडचे को फाऊंडर विवेक देशपांडे, व अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. सोबती आणि त्याचा इंग्रजी अनुवाद कॅम्पनियन हे वेगळ्या प्रकारचं पुस्तक असून रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला सकारात्मकता देते, असे सांगताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी, येत्या 15 दिवसात उत्तर नागपुरात डायलेसिस सेवा मोफत देणारे केंद्र सुरु करण्यात येणार असून इतर सेवा अत्यंत कमी शुल्क देऊन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिली.

 

 

 

दरम्यान, डायलेसिस शिवाय पार्किंसन आणि इतर आजार ज्यावर औषधं नाही त्याबद्दल अधिक जागृतीपर माहिती पुस्तकात जोडा, असा सल्लाही त्यांनी दिला. सोबती पुस्तक मध्ये काळजी देणाऱ्या व्रतस्थ आणि तठस्थ व्यक्तीचे वर्णन केले असल्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी सांगितले.ईश्वरची प्रामाणिक प्रार्थना हे आजाराच्या काळात महत्वाची असल्याचे स्वामी राघवेंद्रानंद यांनी सांगितले.

रुग्णांने स्वतःकडे वेगळ्या दृष्टीने पाहावे. त्यांनी या संकटाला संधी म्हणून बघावे. आपण ज्या प्रकारे किडनी आजार आणि हृदयविकार या दोन्ही आजारांना सकारात्मक पद्धतीने हाताळले, ते इतरांना सांगायला पाहिजे, असे वर्षा वेलणकर म्हणाल्या.रुग्णांना त्यांच्या सोबत येणाऱ्या सर्वांना हळू हळू सोबती फाउंडेशनच्या माध्यमाने आजाराच्या जागृती विषयक माहिती देणे सुरु केले. मनाला होणाऱ्या वेदना कमी कश्या करायच्या, वित्त विषयक मदत, आजार कसा समजून घ्यायचा, अवयव दानाचे महत्व या गोष्टी त्यात अंतरभूत केले.

 

आता किडनी आणि इतर आजर या विषयी आम्ही जनजागृती करत असल्याचे वर्षा वेलणकर प्रास्ताविकात म्हणाल्या. शेवटी लेखक चंद्रशेखर वेलणकर यांनी सोबती शब्दाचे महत्व विषद करून सर्व चंगल्या वाईट अनुभवात सोबती असा अर्थ सांगून हे पुस्तक रुग्णालयात सोबत करायला आलेल्या लोकांना वितरित करावे असे त्यांनी सांगितले. पुस्तकाचे अनुवादक राजू कोरती यांनी हे पुस्तक म्हणजे सामाजातील अनेक सोबतींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. काळजीघेणारे हे उद्दात मनाचे समाजरक्षक असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाला मोठ्या संख्यने श्रोते वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा डोंगरवार यांनी केले.